अभिनेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चालू घडामोडींविषयी परखड मत मांडत असतात. शिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना माहिती देत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट या वाचनीय असतात. पण अनेकदा ते ट्रोल होतात आणि या ट्रोलर्सना ते सडेतोड उत्तर देतात. नुकतीच किरण मानेंनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. किरण माने काय म्हणाले? वाचा…

हेही वाचा – काजोलच्या मोबाइल वॉलपेपरवर अजय देवगणचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा आहे फोटो, पाहा व्हिडीओ

किरण मानेंची पोस्ट

वर्चस्ववादी भेकड आहेत. समाजाला समतेच्या, बंधुत्वाच्या नात्यात बांधणार्‍या कलाकृतींची या लोकांना भिती वाटते. म्हणून तर काल पुणे विद्यापीठानं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला अचानक नकार दिला. अर्थात मला फार आश्चर्य नाही वाटलं. कारण मला माहितीये, हल्ली हुकूमशहांच्या भेदरट पिलावळीचा थयथयाट सुरू आहे. द्वेष पसरवणाऱ्या, खोटा भडक इतिहास सांगणार्‍या कलाकृतींना राजाश्रय दिला जातो. यात बहुजन महामानवांचा खरा इतिहास सांगून मानवता आणि प्रेमाचा संदेश देणारी नाटकं आली, सिनेमे आले… ते लोकप्रिय झाले… तर लोक एकमेकांचा तिरस्कार कसे करणार? मग लोकांना एकमेकांत झुंजवून, फूट पाडून सत्ता अबाधित ठेवायचं कारस्थान कसं यशस्वी होणार? या भितीनं हे पछाडले आहेत.

फुले-आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त ‘विद्यार्थी विकास मंच’ने या नाटकाचा प्रयोग १२ एप्रिल रोजी विद्यापीठात आयोजित केला होता. रयतेचं स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी झगडलेल्या छत्रपत्री शिवरायांचा खरा इतिहास दाखवणारं हे नाटक आहे. अचानक एक दिवस आधी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ने प्रयोगाला परवानगी नाकारली. आता यासाठी कुणाचा दबाव असेल? कारण काय? हे शोधायला आपण आपल्या धडावर असलेलं आपलं डोकं वापरूया…

त्यासाठी हे पाहुया की नाटकातून संदेश काय दिला आहे? तर, “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करू नका. शिवरायांनी अठरा पगड जातीचे लोक बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. अनेक विश्वासू मुस्लीम सहकारी त्यांच्या सैन्यात होते.” हा आशय सांगणारं हे नाटक आहे, ज्याचे आजवर साडेआठशे प्रयोग झालेत. सरळ आहे, हा नकार नाटकाला नाही, तर त्यातून मांडल्या जाणार्‍या आशयाला आहे. सेन्सारसंमत असलेल्या नाटकाला नकार दिल्यामुळे पुन्हा हे सिद्ध झालंय की ही दडपशाही संविधानाला पायदळी तुडवत आहे. आता तरी आपल्याला जागं व्हायला हवं. झुंडशाहीला जागा दाखवण्याची वेळ जवळ आलीय. आता त्यांनी कितीही थांबवूद्यात…आपण व्यक्त व्हायचं…
बहरे भी सुनलें, इतनी जोर से बोलेंगे
अंधे भी पढ़ लें इतना साफ लिखेंगे
अगर तुम जमीं पे जुल्म लिख दो,
आसमान पे इंकलाब लिखा जाएगा…
सब याद रखा जाएगा,
सबकुछ याद रखा जाएगा!

– किरण माने.

हेही वाचा –यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व रद्द! जाणून घ्या यामागचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, किरण मानेंच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. “अगदी बरोबर, वास्तव विचार मांडलात”, “या नाटकाचं पुस्तकं छापावं किंवा ई-बुक काढावं, जेणेकरून बहुजन समाजाला या नाटकापर्यंत पोहोचता येईल”, “नाटकाद्वारे सत्य बाहेर येईल. हिच भिती मुनवादी लोकांना आहे”, “आता वेळ आली आहे अशा हुकूमशाही पद्धतीला कायमच हद्दपार करण्याची, आपले विचार खूप छान आहेत”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी किरण मानेंच्या पोस्टवर लिहिल्या आहेत.