छोट्या पडद्यामुळे अनेक कलाकार घराघरांत लोकप्रिय होतात. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात आहे. एखादी मालिका संपल्यावर सुद्धा संबंधित कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात.
‘झी मराठी’ वाहिनीवर २०२३ मध्ये ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका प्रसारित केली जायची. या मालिकेची मूळ कथा ‘झी तेलुगू’वरील ‘वरुधिनी परिणायम’ या तेलुगू मालिकेवर आधारित होती. ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत प्रेक्षकांना अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे ही फ्रेश जोडी पाहायला मिळाली होती.
‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत अभिनेता आयुष संजीवने वेदांत वानखेडे ही भूमिका साकारली होती. त्याने साकारलेली रोमँटिक वेदांतची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. आता हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता लवकरच हिंदी पदार्पण करणार आहे. हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय मालिकेत वेदांत एन्ट्री घेणार आहे.
‘बॉस माझी लाडाची’, ‘३६ गुणी जोडी’ यांसारख्या सुपरहिट मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणार आयुष संजीव हिंदीत पदार्पण करणार आहे. नेहमीच रोमँटिक हिरोची भूमिका साकारणारा हा अभिनेता पहिल्यांदाच खलनायक साकारणार आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

आयुषने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आयुषच्या हिंदी पदार्पणाची बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांसह सिनेविश्वातील त्याच्या मित्रमंडळींनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आयुष नेहमीच सुंदर अभिनय करतो…मराठीसारखा तो हिंदीतही काम करेल”, “वाह अभिनंदन आयुष” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्याला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आयुष मालिकांसह अनेक मराठी म्युझिक अल्बममध्ये देखील झळकला आहे. अभिनयासह तो उत्तम डान्सर सुद्धा आहे. लवकरच तो चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.