सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे काही चांगल्या मालिका बंद होत आहेत. झी मराठीवरील ‘लोकमान्य’ ही मालिका अचानक प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचा समजताच सर्वांना धक्का बसला. तर त्या पाठोपाठ आता काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेली आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर त्या जागी सुरु होणाऱ्या नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
झी मराठीवर रंजक वळणावर सुरू असलेली ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपी कमी असल्याने चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. तर त्या जागी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. नुकताच या नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला. ही गोष्ट दोन सख्ख्या बहिणींची आहे.
वीस वर्षांपूर्वी काही कारणांनी या दोन बहिणींची ताटातूट झाली. त्यापैकी एक बहीण आता कोकणात स्थायिक आहे तर दुसरी परदेशात वास्तव्यास आहे. त्या दोन बहिणींमध्ये असं काय घडलं की त्या दुरावल्या? आता पुन्हा त्या जवळ येणार का? हे सगळं या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
हेही वाचा : ठरलं! ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं परीक्षण करणार बॉलीवूडमधील ‘ही’ आघाडीची गायिका, परीक्षकांची नावं समोर
या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत आणि अभिनेता अशोक शिंदे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. २१ ऑगस्ट पासून संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येईल.