मराठी टेलिव्हिजनवर प्रतिष्ठित मानला जाणारा झी मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यासाठी भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी कोण ठरणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचं नाव या पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलं. अलीकडेच ते ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत झळकले होते. यामध्ये त्यांनी तुळजाच्या वडिलांची म्हणजेच डॅडींची भूमिका साकारली होती.

‘झी मराठी’ वाहिनीने गिरीश ओक यांना पुरस्कार प्रदान करताना खास त्यांच्यासाठी पत्रवाचन केलं. अभिनेते सुनील बर्वे यांनी हे पत्र वाचलं.

गिरीश ओक यांना जीवनगौरव पुरस्कार

“मैं जिंदगी का साथ निभाता चला गया| हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया|” मोहम्मद रफींच्या या गाण्याला त्यांनी ओठांवरच्या शब्दांपुरतं मर्यादित न ठेवता त्याला स्वतःच्या आयुष्याचं गाणं बनवलं. जसं कठीण अशा वैद्यकीय सूत्रांना गाण्याच्या चाली लावून त्याच्या भीतीचा रेट कमी केलात, तसंच कधीही, कुणालाही न दिसलेला, कुठेही बाऊ न केलेला, आपल्या नागपूरच्या संत्र्याच्या बर्फीपासून मुंबईतल्या वडापावपर्यंतचा प्रवास आपणच सहज सोपा केलात.

“तो मी नव्हेच”, म्हणत गिरीश ओक यांनी सगळ्याच क्षेत्रात मुशाफिरी केली! घरच्या मंडळींच्या शब्दाखातर डॉक्टर तर झालातच, पण उत्तम अभिनय करता करता सगळ्या गोष्टी विचित्र नव्हे, तर चिवित्र नजरेने पाहिल्यात, मग ते सह-कलाकाराला बुटाच्या लेसचे गोंडे करून १० डॉलरमध्ये विकणं असो, तर कधी २६ जुलैच्या पावसात घरावर ओढवलेल्या पूरपरिस्थितीनंतर झालेल्या मालिकेच्या परिसंवादात “बरेच दिवसांनी सगळं कसं शुभ्र, चकचकीत आणि नीटनेटकं दिसतंय” अशी स्वतःच्याच दुःखावर केलेली मिश्किल टिपणी असो! आपल्या अशा मिशीतल्या ह्युमरने आम्हाला हसवत राहिलात.

स्वप्नं सगळेच पाहतात, पण तुम्ही पायाशी लोळण घालणारं सुख बाजूला सारून मुंबईत आलात! मुंबईच्या या धावत्या जगण्यात भुकेसमोर पाणी पिऊन ढेकर द्यायची कला अवगत करून घेतलीत. “जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया” असं म्हणत, “आजच्या अपमानात उद्याचं यश शोधलंत, आणि एकलव्यासारखं शिकता शिकता पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी द्रोणाचार्य झालात”

आपला “डॉक्टर गिरीश ओक ते अभिनेता गिरीश ओक” हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. आपल्या अभिनयाच्या प्रवासात आपलं झी मराठीबरोबरचं असलेलं नातं ‘अवंतिका’, ‘पिंजरा’, ‘या सुखांनो या’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘जुळूनी येती रेशीमगाठी’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘अग्गंबाई सूनबाई’ ते आताच्या ‘लाखात एक आमचा दादा’पर्यंत अधिक घट्ट होत गेलं, आणि ते अजून वृद्धिंगत होत जावो हीच आपल्या लाडक्या बाप्पा चरणी प्रार्थना.

डॉक्टर; आपली कला, आपली उर्जा, आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, तुमच्या अभूतपूर्व कार्याला सलाम!

दरम्यान, गिरीश ओक यांचे कुटुंबीय सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. पुरस्कार जाहीर होताच त्यांना संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.