Kamali Upcoming Twist: ‘कमळी’ या मालिकेत सतत नवनवीन गोष्टी घडताना दिसतात. कमळी सिद्धटेकहून मुंबईला शिक्षण घेण्यासाठी आली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कमळी आली आहे.
मुंबईत आल्यापासून मात्र तिला अनिका आणि तिची आजी व आई त्रास देत आहेत. कॉलेजमधून कमळी व निंगीला काढण्यासाठी अनिका अनेक प्रयत्न करताना दिसते. दुसरीकडे अनिकाची आजी कामिनी राजनच्या पहिल्या पत्नीचा व तिच्या मुलीचा शोध घेत आहे. राजनची पहिली पत्नी गौरी ऊर्फ सरोज व मुलगी कमळी आहे. कामिनीच्या कारस्थानामुळे त्यांची अनेक वर्षे भेट होऊ शकली नाही.
राजनला त्याच्या बायको आणि मुलीबाबत काहीही माहिती नाही. राजन व त्यांची भेट होऊ नये म्हणून कामिनी सरोजला शोधून तिला मारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सरोज कमळीच्या काळजीने मुंबईत आली आहे. मात्र, आई-मुलीची भेट होण्याअगोदरच त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
कमळी व सरोजवर कोसळणार मोठं संकट
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पोलीस कमळीला घेऊन जात आहेत. ते पाहून अनिका म्हणते, “माझं आधीच ऐकलं असतंस, तर आज ही वेळ आलीच नसती.” पोलीस कमळीला तुरुंगात बंद करतात. अनिका पोलीस ठाण्यामध्ये येते. ती कमळीला म्हणते, “मलाच अॅटीट्यूड दाखवत राहिलीस ना, तर आता कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नाहीस.”
दुसरीकडे कमळीची आई सरोज मुंबईत पोहोचली असल्याचे दिसते. इतक्या मोठ्या मुंबईत ती गांगरून गेली आहे. ती मनातल्या मनात म्हणते, “एवढ्या मोठ्या मुंबईत कमळीला शोधायचं कसं”, प्रोमोमध्ये पुढे तिला पाहायला मिळते की, कमळी तुरुंगात विचार करीत बसली असताना पोलीस काही बायकांना घेऊन येतात आणि तुरुंगात टाकतात. त्यात सरोजदेखील असते. ती पोलिसांसमोर रडत म्हणते, “मी त्यातील बाई नाही. मी आजच गावाकडून आली आहे”, पण पोलीस तिचे काही ऐकत नाहीत. कमळीला आवाज ओळखीचा वाटतो. ती तिच्या जागेवरून उठते. तोपर्यंत सरोजला तिच्या शेजारच्या तुरुंगात टाकले जाते. त्यामुळे कमळी व सरोजची भेट होत नाही.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कमळी आणि सरोजची होणार का तुरुंगात भेट?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, कॉलेजमध्ये निवडणुका आहेत. या निवडणूकीत अनिका आणि निंगी एकमेकींच्या विरोधात होत्या. मात्र, अनिकाने निंगीला मारहाण केली. त्यानंतर कमळी निवडणुकीत उभी राहिली. याचदरम्यान तिने हॉस्टेलमध्ये एक पार्टी ठेवली होती. अनिका तिथे आली. तिने पुन्हा कमळीविरुद्ध कारस्थान केले. तिच्या खोलीत ड्रग्ज ठेवले. तिने मते मिळविण्यासाठी पोलिसांना बोलावून कमळी विद्यार्थ्यांना ड्रग्ज देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कारवाई केल्याचे दिसत आहे.
आता मालिकेत पुढे काय होणार? कमळी व तिच्या आईची कशी आणि कधी भेट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.