Marathi Actress Aalapini : संतांचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी ही परंपरा म्हणजे जणू महाराष्ट्रातील भक्तीचं एक आगळं आकर्षणच आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी विठूनामाचा गजर करीत दर्शनासाठी जातात. आषाढी वारीनिमित्त ज्ञानोबा, तुकोबांसह संतांच्या अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करतात. पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांचे डोळे आसुसलेले असतात.

पायी वारी करण्याचा अनुभव हा अदभुतच असतो. त्यामुळे सामान्य वारकऱ्यांसह अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभागी होत विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होत असतात. अशातच झी मराठीवरील एक लोकप्रिय अभिनेत्रीही नुकतीच वारीत सहभागी झाली होती आणि ती अभिनेत्री म्हणजे आलापिनी. आलापिनी वारीत सहभागी झाली असून, त्याचे काही खास क्षण तिनं शेअर केले आहेत.

आलापिनीनं या वारीत सहभाग झाल्याचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आलापिनी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांमध्ये देहभान हरपून चालत असल्याचे दिसत आहे. तसेच या वारीत तिनं हातात टाळ घेत विठुनामाचा जयघोषही केला. त्याशिवाय तिनं स्वत:च्या डोक्यावर तुळसही घेतल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आलापिनीची इन्स्टाग्राम पोस्ट

वारीत सहभागी झाल्यानिमित्त आलापिनीनं या व्हिडीओसह तिचा अनुभवही शेअर केला आहे. या अनुभवाला तिनं ‘संचित’ असं म्हटलं आहे. तर पुढे ती असं म्हणते, “मी वारीत फक्त १० ते १२ किलोमीटर चालले; पण हा अनुभव खूपच भारी होता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वारीत चालताना मनात कोणतेही नकारात्मक विचार नव्हते, होता तो फक्त शुद्ध आणि निखळ आनंद.”

पुढे आलापिनी असं म्हणते, “वारकऱ्यांबरोबर नाचणं, गाणं हा एक जणू आशीर्वादच होता. या अवघ्या काही क्षणांत मनात कोणताही राग किंवा चिडचिडेपणा नव्हता. माणसांनी वेढलेल्या या गर्दीत मला कशाचीही चिंता वाटत नव्हती. हा सुखद अनुभव म्हणजे आनंद नाही, तर आणखी काय आहे?” आलापिनीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आलापिनीनं शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूपच पसंत पडला आहे. चाहत्यांनी तशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. आलापिनीच्या व्हिडीओखाली अनेकांनी, “पांडुरंग हरी”, “जय जय राम कृष्ण हरी”, “हे खास क्षण शेअर केल्याबद्दल धन्यवाद”, “खूपच छान” अशा कमेंट्स करीत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलापिनीबद्दल सांगायचं झालं तर, ती झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत तिनं लीलाच्या धाकट्या बहिणीची (रेवती) भूमिका साकारली होती. अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स शेअर करीत असते. अशातच तिनं तिच्या वारीचा अनुभव शेअर केला आहे.