Zee Marathi : ‘झी मराठी’ वाहिनीवर नुकताच पुरस्कार सोहळा दणक्यात पार पडला. हा पुरस्कार सोहळा दोन भागांमध्ये प्रसारित करण्यात आला होता. या सोहळ्याचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी मोठ्या आवडीने पाहिले. यानंतर दिवाळीच्या आठवड्यात सुद्धा झी मराठीच्या मालिकांना प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं नुकत्याच समोर आलेल्या रेटिंग्जवरून स्पष्ट झालं आहे.
गेल्या ४ वर्षांतील सर्वाधिक Viewer रेटिंग्ज मिळवत ‘झी मराठी’ने दिवाळीच्या आठवड्यात मोठं यश मिळवलं आहे. वाहिनीवर सध्याच्या घडीला ‘सावळ्याची जणू सावली’, ‘पारू’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘लक्ष्मी निवास’, ‘कमळी’, ‘तारिणी’, ‘देवमाणूस’, ‘तुला जपणार आहे’ या विविध विषयांवरील मालिका सुरू आहेत.
‘कमळी’ या ४ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय कमळीला झी मराठीवर सर्वाधिक टीआरपी आहे.
‘तारिणी’ आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या दोन मालिकांनी सुद्धा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘तारिणी’ मालिकेत हळुहळू नात्यांचा गुंता उलगडत जातोय. तर, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत समर स्वानंदीचा ग्रँड लग्नसोहळा पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने मालिका एक वेगळं वळण घेईल.
नव्या मालिका, विविध मालिकांमध्ये येणारे ट्विस्ट, दमदार कलाकार या जोरावर ‘झी मराठी’ने दिवाळीच्या ( वर्षातील ४२ वा आठवडा – ३२.४ टक्के शेअर ) आठवड्यात गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक रेटिंग्ज मिळवत टीआरपीच्या शर्यतीमधील आपलं स्थान अजून घट्ट केलं आहे.
आता ‘झी मराठी’ला टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतील अशा कमेंट्स चाहत्यांकडून करण्यात येत आहे. अभिनेत्री महिमा म्हात्रेने ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

दरम्यान, महिमा म्हात्रेबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत मीरा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
