Tejashri Pradhan & Subodh Bhave : छोट्या पडद्यावरची लाडकी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जातं. तिने आजवर ‘प्रेमाची गोष्ट’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. काही महिन्यांपूर्वीच तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून अचानक एक्झिट घेतली होती. यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते.
तेजश्रीने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करावं अशी तिच्या चाहत्यांची मनापासून इच्छा होती. अखेर अभिनेत्रीने तिच्या सर्व चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
तेजश्रीच्या सोबतीला यावेळी लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे झळकणार आहे. तेजश्री आणि सुबोध ‘झी मराठी’ वाहिनीवर कमबॅक करणार आहेत. सुबोध भावेने इन्स्टाग्रामवर ‘होणार सून ‘ती’ ह्या घरची’ अशी पोस्ट शेअर करत याला “लवकरच…” असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये सुबोधने तेजश्रीला टॅग केलं आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर ‘झी मराठी’ वाहिनीने “हार्ट इमोजी” देत कमेंट केली आहे.
याशिवाय तेजश्रीने सोशल मीडियावर “तुला पाहते रे” अशी पोस्ट शेअर केली आहे. हे सुबोधच्या जुन्या मालिकेचं नाव देखील आहे. तेजश्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “कोणाला पाहते माहीत आहे का?” असं लिहिलं आहे. यावर सुद्धा ‘झी मराठी’ची कमेंट आहे. यावरून दोघांचीही नवीन मालिका येत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.
आता तेजश्री आणि सुबोध भावे यांच्या नव्या मालिकेचं नाव काय असणार? ही मालिका केव्हा सुरू होणार याचा उलगडा लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीकडून करण्यात येईल. तेजश्री व सुबोध भावे यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या दोघांची एकत्र मालिका सुरू झाल्यास यामुळे वाहिनीच्या टीआरपीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तेजश्री आणि सुबोधच्या कमबॅकमुळे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. “खूप प्रेम”, “वॉव यार”, “मजा येणारे तुम्हाला दोघांना पुन्हा एकत्र बघायला”, “ऑनस्क्रीन तेजश्री प्रधान विथ सुबोध भावे अजून काय हवं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.