Veen Doghatli Hi Tutena: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत लवकरच लग्नकार्य पार पडणार आहे. स्वानंदी लग्न होऊन समर राजवाडेच्या घरी जाणार आहे; तर अधिरा रोहनच्या घरी जाणार आहे.

मुहूर्तमेढ, चुडा, मेंदी असे लग्नाआधीचे विधी पाहायला मिळाले. हा शाही विवाहसोहळा गोव्यात पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यात सर्व जण उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाले आहेत. मात्र, मल्लिकाकाकूला हे लग्न होऊ द्यायचे नाही. तिला राजवाडेंच्या घरची सून म्हणून स्वानंदी नको आहे.

समरची बायको म्हणून स्वानंदीने त्या घरात यावे, असे तिला वाटत नाही. त्यामुळे हे लग्न मोडण्यासाठी मल्लिका सतत काही ना काही कारस्थान करीत असते. स्वानंदीला त्रास होईल, समरचा स्वानंदीबाबत गैरसमज निर्माण होईल, असे ती वागत असते.

समर-स्वानंदीच्या लग्नात घडणार असं काही की…

आता वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गोव्यात हा विवाहसोहळा सुरू आहे. लग्नासाठी समुद्रकिनारी मांडव सजला आहे. स्वानंदी लग्नासाठी तयार झाली आहे. तिने गुलाबी रंगाचा शालू नेसला आहे. गळ्यात काही दागिने घातले आहेत. तसेच कपाळावर मुंडावळ्या, नाकात नथ, टिकली, बांधलेले केस अशा पारंपारिक वेशभूषेत ती तयार झाली आहे. समरदेखील पारंपरिक वेशभूषेत लग्नासाठी तयार झाला आहे.

दुसरीकडे अधिरा व रोहन यांनी डान्स करीत मांडवात एन्ट्री केल्याचे दिसत आहे. अधिराने लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे. त्यानंतर त्यांचे लग्नाचे विधी पार पडताना दिसत आहेत. त्यांच्यावर अक्षता पडत असल्याचे दिसत आहे. प्रोमोच्या शेवटी जेव्हा स्वानंदी व समर एकमेकांना हार घालत असतात, तेव्हा अधिराची मोठी बहीण येते आणि म्हणते, “थांबा, हे लग्न होऊ शकत नाही.” तिच्याकडे समर व स्वानंदी आश्चर्याने पाहत असल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘समुद्रकिनारी मांडव सजणार, समर-स्वानंदीची वीण जुळणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

आता मालिकेत पुढे काय होणार, ऐन लग्नाच्या वेळी आलेल्या संकटाला समर व स्वानंदी कसे सामोरे जाणार, हा लग्नसोहळ कसा पार पडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.