‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रमोशनच्या मुद्द्यावरून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला अनेक लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागालं. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ‘कपिल शर्मा शो’वर काही गंभीर आरोप केले होते. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर कपिल शर्मावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका करण्यात आली होती. या सर्व वादावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया म्हणून कपिल शर्मानं एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र आता यावर स्वतः अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ अर्धवट असल्याचं म्हटलं आहे.

कपिल शर्मानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जी एका मुलाखतीतील क्लिप आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर म्हणतात, ‘मी खरं सांगणार आहे. मला या शोसाठी विचारण्यात आलं होतं. पण मी माझ्या मॅनेजरला सांगितलं होतं की हा एक गंभीर चित्रपट आहे आणि तो एक कॉमेडी शो आहे त्यामुळे मी जाऊ शकणार नाही. कपिल शर्मानं नकार दिला नव्हता तर मी या शोसाठी नाही म्हटलं होतं. कारण या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा कॉमेडी शो करणं मला योग्य वाटत नव्हतं.’

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रीला याचे परिणाम भोगावे लागतील…”, ‘द काश्मीर फाइल्स’वर मनोज मुंतशिर यांचं ट्वीट चर्चेत

अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना कपिलनं लिहिलं होतं, ‘माझ्यावर करण्यात आलेल्या सर्व खोट्या आरोपांवर स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद अनुपम जी आणि त्या सर्व मित्रांचेही आभार ज्यांनी सत्य माहीत नसतानाही मला एवढं प्रेम दिलं. आनंदी राहा आणि हसत राहा.’

आता कपिलच्या याच व्हिडीओवर अनुपम खेर यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘प्रिय कपिल, तू अर्धसत्य सांगण्यापेक्षा संपूर्ण व्हिडीओ पोस्ट केला असता तर चांगलं झालं असतं. संपूर्ण जग सेलिब्रेट करत आहे मग आज रात्री तू देखील हा आनंद साजरा कर. नेहमीच प्रेम आणि प्रार्थना.’

आणखी वाचा- “कपिल शर्माने नकार दिला…”, ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमोशन वादावर अनुपम खेर यांचा व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी कपिल शर्मा संदर्भात एक ट्वीट केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. या ट्वीटमध्ये त्यांनी, ‘चित्रपटात मोठी स्टार कास्ट नसल्यानं आम्हाला प्रमोशनसाठी मेकर्सनी नकार दिला.’ असं म्हटलं होतं ज्यावरून मोठा वाद झाला होता. त्यांचं हे ट्वीट बरंच चर्चेतही आलं होतं.