‘स्टुडंट ऑफ द इअर २’चा ट्रेलर पाहून वरूण म्हणतो…

स्टुडंट ऑफ द इअर २’ हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट आहे

वरुण धवन

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपट सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना त्याची उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असतानाच अभिनेता वरुण धवननेही त्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन हा मुख्य भूमिकेमध्ये झळकला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेता टायगर श्रॉफची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर वरुणने पाहिला. त्यानंतर त्याने त्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

”स्टुडंट ऑफ द इअर २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या नव्या स्टुडंटचं मनापासून अभिनंदन. कोणत्याही चित्रपटाचा सीक्वल करणं ही सोपी बाब नसते. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तू यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि तुझी हीच मेहनत आता जगासमोर येणार आहे”, असे म्हणत वरूणने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. याच चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुमारे ७५ कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. आता सीक्वलच्या दिग्दर्शनाची धुरा पुनीत मल्होत्रावर आहे. पुनीतने याआधी ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘गोरी तेरे प्यार मैं’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Varun dhawans reaction on student of the year 2 trailer