scorecardresearch

‘थ्री इडियट्स’मधील मराठमोळ्या अभिनेत्यावर कोसळले आर्थिक संकट, चाहत्यांकडे केली मदतीची मागणी

गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पटवर्धन हे कठीण काळातून जात आहेत.

‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट बॉलिवूडसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांसह बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. अभिनेता आमीर खान, आर.माधवन, शर्मन जोशी यांच्यासह अभिनेत्री करीना कपूर, अभिनेते बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात बोमन इराणी यांच्या पसर्नल असिस्टंट ‘गोविंद’चे पात्र ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र पटवर्धन यांनी साकारले होते. पण त्यानंतर ते फारसे चित्रपटात दिसले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पटवर्धन हे कठीण काळातून जात आहेत. ते आजारी असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांनी चाहत्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

‘मराठी नाट्य कलाकार संघ’ या फेसबुक ग्रुपवर गेल्या आठवड्यापासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात प्रसिद्ध राजेंद्र पटवर्धन हे आजाराने ग्रस्त आहेत, असे सांगण्यात आले आहे. त्यासोबत त्यांना नेमकं काय झालंय हे देखील सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पोस्टद्वारे त्यांनी त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची सांगितले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट काय आहे?

“मला काही बोलायचे आहे, सांगायचे आहे…मी एक साधा माणूस. व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटक केलेला पण मी सेलिब्रिटी नाही. मी एक नट, उत्तम संस्थेत काम केलेले आहे..उदा. विनय(सर) आपटे बाकी मी काही बोलणार नाही…कारण आज माझा दिवस नाही. याचे कारण आमचा एक मित्र राजू पटवर्धन (राजू पटवर्धन माझ्याबरोबर “अपराध मीच केला”, या नाटकात होते. असो!”

“आत्ता ते खूप आजारी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचा एक पाय मांडीपासून कापला गेला आहे…आता त्याचा उजवा हात देखील निकामा झाला आहे. हा आता भरारी अपंगालयात आहे. तो एकटा, अविवाहित आहे. वय साठीच्यापेक्षा जास्त. मी व माझा मित्र प्रसिध्द दिग्दर्शक, लेखक, निर्माता अमोल भावे आम्ही त्याच्यासाठी पैसे गोळा करत आहोत.”

“हे अपंगालय म्हणजे. भरारी अपंगालय…मानपाडा गाव, उंबरली रोड, साई धारा टॉवर्स, डोंबिवली पूर्व इथे आहे. गरज आहे ती आर्थिक मदतीची…आत्तापर्यंत मी, अमोल भावे, संध्या म्हात्रे, प्रसन्ना आठवले, दीपक परुळेकर, शेखर जोशी, संध्या दानव, काका हरदास व इतर अनेक मदत करत आहेतच आपणही करावी..फार नाही किमान शंभर पाचशे हजार जास्त नको! राजू पटवर्धन यांनी शेवटची भूमिका हिंदी चित्रपट थ्री इडियट्स आणि मराठीमध्ये भिकारी आणि टपाल यात केली होती”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

मदत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील

  • RAJANDRA MANOHAR PATWARDHAN
  • TJSB SAHAKARI BANK
  • A/C NO – 002110100016259
  • BRANCH – THANE ( WEST )
  • IFSC CODE – TJSB0000002

लोकसत्ता डॉटकॉमने राजेंद्र पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील याची खातरजमा केली. तसंच आपल्यावर आर्थिक संकट कोसळल्याचे सांगितले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Veteran actor rajendra patwardhan suffering from illness need financial help who played role in 3 idiots movie nrp