‘ऊ ला ला गर्ल’ म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनन तिच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. आजही प्रेक्षक विद्या बालन चित्रपटात आहे म्हंटल्याव हमखास तो चित्रपट बघतात. ‘हम पांच’सारख्या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली विद्या आज बॉलिवूडची सर्वात अनुभवी अभिनेत्री आहे. नुकताच तिचा ‘शेरनी’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मध्यंतरी विद्याने एका मुलाखतीमध्ये तिचा आणि महेश भट्ट यांचा एक किस्सा सांगितला होता.

महेश भट्ट यांचा एक फोन आला आणि विद्या बालनला अश्रु अनावर झाले आणि ती त्यामुळे ढसाढसा रडायलाच लागली. २००५ साली ‘परिणिता’मधून विद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई, गुरु, भूलभुलैया, इश्कीया असे तिचे बरेच चित्रपट चांगलेच गाजले. त्यानंतर ‘द डर्टी पिक्चर’साठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. यानंतर मात्र तिच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. मध्यंतरी तिने सिद्धार्थ रॉय कपूर या निर्मात्याशी लग्न केलं आणि काही काळ ती चित्रपटापासून लांब राहिली.

आणखी वाचा : “मला ब्रह्मास्त्र पुन्हा बघायचाय कारण…” हृतिक रोशनची चित्रपटावर पहिली प्रतिक्रिया, ट्वीट होतंय व्हायरल

फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विद्याने या पडत्या काळाविषयी खुलासा केला आहे, ती म्हणते, ” माझे ‘घनचक्कर’ किंवा ‘शादी के साइड इफेक्ट’सारखे चित्रपट सपशेल आपटले होते. त्यानंतर भट्ट ग्रुपबरोबर मी पुन्हा इम्रान हाशमी बरोबर ‘हमारी अधुरी कहानी’ हा चित्रपट केला. त्या चित्रपटानेही निराशाच पदरी पाडली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महेश भट्ट यांनी मला फोन केला आणि अत्यंत नाराजीच्या स्वरात ते म्हणाले की, चित्रपट चालला नाही. त्यांचा तो आवाज ऐकून मला अश्रु अनावर झाले आणि मी रडू लागले. त्यानंतर सिद्धार्थ मला चेंबुरच्या साई बाबा मंदिरात घेऊन गेला. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत कारमध्ये माझेही अश्रु थांबत नव्हते. माझं कुठे काय चुकलं याचा मी विचार करू लागले. मग एका क्षणानंतर मी ती गोष्ट मनातून काढून टाकली आणि चित्रपट चित्रित करतानाच्या आठवणींमध्ये रमले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शेरनी’ पाठोपाठ विद्या बालन ‘जलसा’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने एका पत्रकाराची भूमिका बजावली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री शेफाली शहादेखील होती. यात या दोघींच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. विद्या सध्या अनू मेनन दिग्दर्शित ‘नियत’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.