Vijay Deverakonda Talk’s About ED : बुधवारी, ६ ऑगस्ट २०२५ रोजी अभिनेता विजय देवरकोंडा हैदराबादमधील बशीराबाग येथील अंमलबजावणी संचालनालय (ED) कार्यालयात हजर झाला. त्याला ऑनलाइन सट्टा (बेटिंग) अ‍ॅप्सच्या जाहिरातीत सहभागाबाबत चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. चौकशीनंतर विजयने माध्यमांशी संवाद साधला.

‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार विजय देवरकोंडाने सांगितलं, “माझं नाव एका अ‍ॅपशी संबंधित प्रकरणात पुढे आल्यामुळे मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. भारतात दोन प्रकारचे अ‍ॅप्स असतात – सट्टा अ‍ॅप्स आणि गेमिंग अ‍ॅप्स. मी चौकशीत स्पष्टपणे सांगितलं की मी A23 नावाच्या गेमिंग अ‍ॅपचा प्रचार केला होता. सट्टा अ‍ॅप्स आणि गेमिंग अ‍ॅप्स यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. अनेक राज्यांमध्ये गेमिंग अ‍ॅप्स कायदेशीर आहेत. ही अ‍ॅप्स नोंदणीकृत आहेत, त्यांच्यावर जीएसटी, कर लागतो आणि आवश्यक परवानेही घेतलेले असतात.”

“मी माझ्या सर्व बँक व्यवहारांची माहिती ईडीला दिली आहे. मी ज्याचा प्रचार केला तो A23 अ‍ॅप तेलंगणामध्ये उपलब्धही नाही. मी फक्त कायदेशीर गेमिंग अ‍ॅपचाच प्रचार केला आहे. तसेच संबंधित कंपनीसोबत झालेल्या कराराची माहितीही मी ईडीला दिली आहे,” असे त्याने सांगितले.

बुधवारी सकाळी जेव्हा विजय देवरकोंडा ईडी कार्यालयात पोहोचला, तेव्हा माध्यमांनी त्याला गराडा घातला. मात्र, त्यावेळी त्यांच्या टीमने सांगितले, “सर बोलू शकत नाहीत.”विजय देवरकोंडाव्यतिरिक्त, आणखी २९ सेलिब्रिटींना ईडीने समन्स पाठवले असल्याचे सांगितले जात आहे.

३० जुलै २०२५ रोजी अभिनेता प्रकाश राज हैदराबाद येथील ईडी कार्यालयात हजर झाले होते. चौकशीबद्दल बोलताना प्रकाश राज म्हणाले, “या देशाचा नागरिक म्हणून सट्टा अ‍ॅप्समधील मनी लाँडरिंगप्रकरणी अधिकाऱ्यांनी माझ्याकडे चौकशीसाठी संपर्क केला आणि मी हजर झालो. हे प्रकरण २०१६ मधील आहे, त्यानंतर नैतिक कारणास्तव मी त्यात पुढे काहीच केले नाही. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी त्यातून कोणतेही पैसे घेतलेले नाहीत, कारण मला तसं करायचंच नव्हतं. त्यांनी सर्व माहिती घेतली आणि चौकशी पूर्ण झाली, एवढंच.”