ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री रिमा हे दिग्गज कलाकार पहिल्यांदा रंगभूमीवर एका नाटकाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. शेखर ढवळीकर लिखित ‘के दिल अभी भरा नही’ या आगामी नाटकात या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचीही नाटकात प्रमुख भूमिका आहे.
‘सावधान शुभमंगल’, ‘रिमोट कंट्रोल’, ‘बहुरुपी’ आणि ‘नकळत सारे घडले’ अशा लोकप्रिय आणि रसिकप्रिय ठरलेल्या नाटकांचे लेखक शेखर ढवळीकर यांनी लिहलेले हे नवे नाटक ‘सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम हे करत असून विक्रम गोखले यांनी या अगोदर ढवळीकर यांनी लिहिलेल्या ‘नकळत सारे घडले’ या नाटकात काम केले होते.
१९ फेब्रुवारी २०१३ रोजी विक्रम गोखले यांनी पेण येथे आपण यापुढे रंगभूमीवर काम करणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानुसार गेला काही काळ गोखले रंगभूमीपासून दूरच होते. मात्र ढवळीकर यांचे ‘के दिल अभी भरा नही’ हे नवे नाटक गोखले यांनी ऐकले आणि असा निर्णय घ्यायला नको होता, असे वाटावे, इतके हे नाटक चांगले असल्याचे गोखले यांना वाटले. पण नाटकासाठी गोखले यांना विचारणा करण्यात आली आणि हे नाटक करण्याचे त्यांनी ठरविले.
या नाटकाबद्दल ‘रविवार वृत्तान्त’ला माहिती देताना विक्रम गोखले म्हणाले, लग्नानंतर नवरा आणि बायको आपापल्या सांसारिक आणि अन्य सर्व जबादाऱ्या पार पाडतात पण संसाराच्या या रहाट गाडग्यात ‘भावनिक भावबंध’कायमचे जपण्याचे राहून जाते. नाटकातून हेच विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. ढवळी पुरुष आणि स्त्री दोघानीही भावनिक भावबंध जपण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे आणि योग्य वेळी हे न करता जर अचानक करावे लागले तर काय होईल, हे नाटकात पाहायला मिळेल. ढवळीकर यांनी एक अत्यंत महत्वाच्या विषय नाटकातून मांडला आहे. हसवता हसवता डोळ्यात पाणी उभे करणारे हे नाटक प्रत्येक घराघरातील नवरा बायकोचे आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री रिमा आणि विक्रम गोखले यांची जोडी या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येत आहे. तर ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर हे ही या नाटकात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे नाटक रंगभूमीवर दाखल होणार आहे.