विक्रम वेताळ ही गोष्ट आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण या गोष्टीला मनोरंजनाची फोडणी दिली तर एक उत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनू शकतो आणि तो चांगलाच हीटसुद्धा होऊ शकतो हे २०१७ साली आलेल्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाने सिद्ध केलं होतं. पुन्हा त्याच चित्रपटाचा रिमेक बनवणं आणि तोही अगदी हुबेहूब ही गोष्ट आजच्या काळात पचणारी नसली तरी हा हिंदीमधला ‘विक्रम वेधा’देखील उत्तम बनला आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल. ज्यांनी तामीळ चित्रपट पाहिला नसेल त्यांच्यासाठी तर हा नवा रिमेक म्हणजे मेजवानीच आहे. दिग्दर्शक पुष्कर-गायत्री यांनी चित्रपटाच्या मुख्य कथेला धक्का न लावता एक वेगळेपण या चित्रपटातून दाखवलं आहे.

लखनौ आणि कानपूर या दोन शहरातील गुन्हेगारी विश्वाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. वेधा या कुख्यात गँगस्टरला पकडण्यासाठी पोलिसांची एक विशेष तुकडी काम करत असते, अशातच भूमिगत असलेला वेधा हा समर्पण करण्यासाठी समोर येतो आणि ‘विक्रम’ या पोलिस अधिकाऱ्याला ३ वेगवेगळ्या गोष्टी सांगून कोड्यात टाकतो. त्याने घातलेलं कोडं सोडवताना इतर घडामोडी आपल्यासमोर घडतात आणि हा उंदरा मांजराचा खेळ आणखीन गडद होत जातो. शेवटी वेधा विक्रमच्या हाती लागतो की नाही आणि जेव्हा हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा नेमकं कोणतं धर्मसंकट विक्रमसमोर उभं राहतं? याचं उत्तर तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यावर नक्की मिळेल.

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

आणखी वाचा : “कितीही रोष असला तरी…” लंडनच्या पोस्टवरुन ट्रोल झालेल्या प्राजक्ता माळीने पुन्हा शेअर केली पोस्ट

कथा, पटकथा आणि संवाद या तीनही गोष्टींमध्ये हा रिमेक सरस ठरला आहे. हिंदी आणि त्यातून कानपूरच्या पठडीतले हिंदी संवाद आणि त्यांचा लहेजा लेखक दिग्दर्शक आणि कलाकार यांनी अचूक पकडला आहे. हाच या रिमेक आणि मूळ चित्रपटातला फरक आहे आणि तो अधोरेखित होतो याचा आनंद आहे. अगदी काही मोजकी दृश्यं बदलली असली तरी हा याला तुम्ही फ्रेम टू फ्रेम रिमेक म्हणू शकता. पण मूळ चित्रपट पाहिलेल्या लोकांना हा रिमेकही तितकाच भावेल यामागची दोन कारणं म्हणजे या चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि हृतिक रोशन, सैफ अली खान यांचा अभिनय.

चित्रपटाचं पार्श्वसंगीत मूळ चित्रपटाप्रमाणेच कथेला साजेसं आहे आणि विशाल शेखर या संगीतदिग्दर्शकांनी त्यात स्वतःची भर घातली आहे. खासकरून ‘अल्कोहोलीया’ या गाण्यात हृतिकचं नृत्यकौशल्य बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. मध्यंतरापर्यंत चित्रपट तसा चांगला आहे पण त्यानंतर याची कथा आणखीन वेगवान होते आणि आपल्यासमोर घडणारं नाट्य हे तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतं. मूळ चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांना नक्कीच ही कथा खिळवून ठेवेल. याबरोबर चित्रपटातले अॅक्शन सीन्स प्रचंड अंगावर येणारे आहेत, मध्यंतरानंतर लगेचच हृतिकशी एका गँगबरोबर झालेली झडप आणि त्यामध्ये दिसणारी हाणामारी अंगवार येते, पण आपण त्यामध्ये पूर्णपणे गुरफटून जातो.

विजय सेतुपती आणि आर माधवन यांच्याशी तुलना होणं स्वाभाविक असलं तरी हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. खासकरून ‘सुपर ३०’नंतर पुन्हा हृतिक हा त्याच्या ठराविक साच्याबाहेर पडला आहे आणि त्याने लाजवाब काम केलं आहे. सैफनेही उत्कृष्टरित्या ‘विक्रम’ साकारला असून त्याने वेगळ्याच पद्धतीने ही भूमिका हाताळली आहे. याबरोबरच राधिका आपटेनेही उत्तम साथ दिली आहे. शरीब हाशमी या अभिनेत्याचंही काम उत्तम झालं आहे. तामीळ चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे पुष्कर-गायत्री यांनी फ्रेम टू फ्रेम रिमेक जरी केला असला तरी काही ठिकाणी त्यांच्या दिग्दर्शनातील नावीन्य अधोरेखित होतं. चित्रपटात ज्या पद्धतीने वेधा विक्रमला कोड्यात पाडून त्याला उत्तर शोधायला भाग पाडतो तसंच चित्रपटाचा शेवटही दिग्दर्शक प्रेक्षकांवरच सोडतात. त्यामध्ये चांगलं-वाईट, पाप-पुण्य, चूक-बरोबर काय हे प्रेक्षकांनी ठरवायचं असतं. एकूणच चित्रपट चांगला आहे, रिमेक जरी असला तरी प्रथमच हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना तो नक्कीच खुर्चीला खिळवून ठेवेल ही खात्री आहे.