Air India Plane Crash : गुरुवारी (१२ जून) गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI171 हे उड्डाण करताना कोसळले. या अपघातात २४० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात अनेक भारतीय आणि काही परदेशी नागरिक होते. या अपघातानंतर मनोरंजन जगतानेही या दुःखाच्या क्षणी शोक व्यक्त केला.
सनी देओल, शाहरुख खान, अक्षय कुमार, सलमान खान आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करून शोक व्यक्त केला. त्याच वेळी काल (१२ जून) अभिनेता विक्रांत मॅसीनेही सोशल मीडियावर पोस्ट करून विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. त्याने असेही सांगितले की, त्याच्या एका जवळच्या व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
अभिनेता विक्रांत मॅसीचा कौटुंबिक मित्र क्लाईव्ह कुंदर याचाही अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला आहे. क्लाईव्ह कुंदर हे अपघातग्रस्त विमानातील फर्स्ट ऑफिसर होते. विक्रांत मॅसीने स्वतः त्याच्या इन्स्टाग्रामवर एका स्टोरीद्वारे ही माहिती दिली. विक्रांतनेही या अपघातात जीव गमावलेल्या लोकांबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि त्यांचे सांत्वन केले आहे.
विक्रांत मॅसीने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “आज अहमदाबादमध्ये झालेल्या अकल्पनीय दुःखद विमान अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना माझी संवेदना. मन खूप दुःखी आहे.”

पुढे त्याने लिहिले, “माझे काका क्लिफोर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा क्लाइव्ह कुंदर गमावला हे जाणून आणखी दुःख झाले, जो त्या दुर्दैवी विमानात फर्स्ट ऑफिसर होता. देव तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला शक्ती देवो.” यानंतर अभिनेत्याने आणखी एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, दिवंगत क्लाइव्ह कुंदर माझे चुलत भाऊ नव्हते. कुंदर आमचे कौटुंबिक मित्र होते.
अपघाताची बातमी कळताच सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली. सध्या संपूर्ण देश शोकाकुल आहे. सर्व बाजूंनी शोक आणि प्रार्थनांचा वर्षाव होत आहे. त्याच वेळी इतर सेलिब्रिटींनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.