Aishwarya Rai Bachchan Wear 200 Kg Gold in Jodhaa Akbar : २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जोधा अकबर’ हा बॉलीवूडमधील सर्वात सुंदर ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक आहे. हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली.

२००८ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट मुघल सम्राट अकबर आणि राजपूत राजकन्या जोधा यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रायने महाराणी जोधाबाईंची भूमिका साकारली होती. या सिनेमातल्या तिच्या शाही लूकची खूप चर्चा झाली होती. तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटात ऐश्वर्याने घातलेले सर्व दागिने खऱ्या सोन्याचे होते. चित्रपट वास्तववादी वाटावा यासाठी निर्मात्यांनी एकही बनावट किंवा इमिटेशन दागिने वापरले नाहीत.

२०० किलोंचे दागिने

चित्रपटात ऐश्वर्या रायच्या दागिन्यांचे एकूण वजन सुमारे २०० किलो होते, ते बनवण्यासाठी २०० कारागीरांना २ वर्षे लागली. सोन्याव्यतिरिक्त या दागिन्यांमध्ये मौल्यवान मोती आणि रत्नदेखील होते, ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात होती.

ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, इतके जड दागिने घालणे तिच्यासाठी खूप कठीण झाले होते. शूटला तयार होण्यासाठी तिला दोन तास लागायचे. या मौल्यवान दागिन्यांच्या सुरक्षेसाठी, चित्रपटाच्या सेटवर ५० सुरक्षारक्षक २४ तास तैनात होते, जेणेकरून चोरी किंवा त्यांचे नुकसान होऊ नये. चित्रपटातील प्रत्येक दृश्य आपल्याला राजस्थानातील राजवाड्यांची आठवण करून देते. ऐश्वर्याच्या कपड्यांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीचे सर्व पोशाख प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केले होते.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर ऐश्वर्याच्या दागिन्यांचे डिझाइन इतके प्रसिद्ध झाले की मार्केटमध्ये अशाच प्रकारचे दागिने ट्रेंड होऊ लागले. आजही लोक लग्न किंवा इतर काही खासप्रसंगी ‘जोधा अकबर’चे डिझाईन केलेले दागिने घालायला पसंती देतात. या चित्रपटाने केवळ त्याच्या स्टोरीचीच नव्हे तर त्याच्या भव्य सेट्स आणि शानदार दागिन्यांमुळे लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. या चित्रपटात ए. आर. रहमान यांचे संगीत आणि जावेद अख्तर यांची गाणी, जसे की ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ आणि ‘जशन-ए-बहरा’, अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत.