बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. अनेक दिग्गज कलाकारांनी सलमानबद्दल काही रंजक किस्से सांगितले आहेत.
दिग्गज अभिनेत्री रेखा एकदा सलमान खानच्या शोमध्ये आल्या होत्या. जिथे त्यांनी सलमान खान त्यांना पहिल्यांदा कधी भेटला हे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, सलमानचा बालपणीचा क्रश एक अभिनेत्री होती. सलमानच्या बालपणीच्या क्रशबद्दल जाणून सर्वांना धक्का बसला.
सलमानला त्याच्या बालपणीच्या क्रशशी लग्न करायचे होते
बॉलीवूडची सुंदर व सदाबहार अभिनेत्री रेखा एकदा २०१४ मध्ये बिग बॉसच्या एका भागात, त्यांच्या ‘सुपर नानी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आल्या होत्या. रेखा म्हणाल्या, “तुला आठवतंय का आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो? त्यानंतर सलमान रेखा यांच्या पाया पडतो आणि नाही-नाही म्हणतो. रेखा विचारतात की, मला सांग तू मला पहिल्यांदा कधी भेटलास. त्यावर सलमान म्हणतो की, मी मोठा झाल्यावर. त्यानंतर रेखा म्हणाल्या- जेव्हा मी सकाळी फिरायला जायचे तेव्हा सलमान ६-७ वर्षांचा असावा, त्यापेक्षा जास्त नाही. तो सायकल चालवायचा. मी पुढे चालायचे आणि तो माझ्या मागे चालायचा. त्याला माहीत नव्हते की, तो त्याच क्षणी माझ्या प्रेमात पडला आहे.”
रेखा पुढे म्हणाल्या की, तो घरी गेला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणाला- मी मोठा झाल्यावर मला त्या मुलीशी लग्न करायचे आहे. या सर्व वेळी सलमान खान लाजून चेहरा खाली करून उभा असल्याचे दिसून येते. सलमानला असे पाहून त्याचे चाहतेही अरेरे म्हणत आहेत. त्या आठवणींवर हसत सलमान म्हणाला, “कदाचित म्हणूनच मी लग्न केले नाही.” त्यावर रेखा हसतात.
सलमान खानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटात सहायक भूमिकेद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९८९ मध्ये सूरज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली, ज्यामुळे तो रातोरात स्टार झाला.
त्यानंतर दबंग (२०१०), बॉडीगार्ड (२०११), एक था टायगर (२०१२), बजरंगी भाईजान (२०१५) व सुलतान (२०१६) या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम करून, सलमानने चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले.