मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. न्यायालयातून जामीन मिळूनही कारागृह प्रशासनापर्यंत कागदपत्रे वेळेत न पोहोचल्याने आर्यन खानला दोन दिवस मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात काढावे लागले. दरम्यान आर्यनला अटक केल्यापासून त्याची तुरुंगातून सुटका होईपर्यंत शाहरुखसोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सतत पाहायला मिळत होता. विशेष म्हणजे आर्यनला अटक झाल्यानंतर मन्नतवर तो सर्वात आधी दाखल झाला. यावेळी त्याने शाहरुखला धीर देत दिलासा दिला. मात्र आर्यनची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सलमान खान मात्र दूरच होता. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर ३० ऑक्टोबरला त्याची सुटका करण्यात आली. आर्यनची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आता चार दिवस उलटून गेले आहेत. यानंतर आर्यनची विचारपूस करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी मन्नतवर दाखल होत आहेत. मात्र सलमान हा शाहरुखच्या बंगल्याजवळ राहत असूनही एकदाही मन्नतवर गेला नाही. या चारही दिवसात त्याने यापासून दूर राहणे पसंत केले.

मात्र सलमान आर्यनला भेटण्यासाठी, त्याची विचारपूस करण्यासाठी का गेला नाही, याची माहिती समोर आली आहे. सलमान हा एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या काळात उपस्थित असेल किंवा नसेल पण वाईट काळात तो त्याच्या मित्रांना नक्कीच मदत करतो, असे त्याच्याबद्दल अनेकदा बोललं जाते. सध्या सलमान हा त्याच्या आगामी चित्रपट ‘अंतिम’चे प्रमोशन सुरु आहे. तर दुसरीकडे हिंदी बिग बॉसचे शूटींग सुरु आहे. त्यामुळे तो सध्या फार व्यस्त आहे.

बॉलिवूड इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आर्यनला भेटायला गेला नाही, असं बोलता येणार नाही. सूत्रांच्या मते, सलमानच्या मते, वाईट काळात लोकांना मित्रांकडून मदत दिली जाते. शाहरुख जेव्हा या संपूर्ण वाईट काळातून जात होता, त्यावेळी तो त्याला धीर देण्यासाठी मन्नतवर गेला. आता आर्यन तुरुंगातून बाहेर आला आहे. त्यामुळे मन्नतमध्ये सर्वजण आनंदी आहेत. यावेळ शाहरुखच्या कुटुंबातील सदस्य त्यांना एकांतात वेळ घालवत आहेत. त्यामुळे मी मन्नतमध्ये जाऊन आर्यनशी तुरुंगातील गोष्टींबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही. आर्यनने जेलच्या आठवणी लवकरात लवकर विसरायला हव्यात. तेच त्याच्यासाठी चांगलं असेल, असे सलमानला वाटते.

Video : आर्यन खानला पाहण्यासाठी मन्नतवर चाहत्यांची तुफान गर्दी

दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानचा जामीन मंजूर केला होता. शाहरुखची मैत्रीण आणि अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी संध्याकाळी २३ वर्षीय आर्यनच्या जामिनासाठी ड्रग्जशी संबंधित खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टात हजर झाली. हायकोर्टाने शुक्रवारी आपल्या आदेशाचा मुख्य भाग उपलब्ध करून दिला ज्यामध्ये आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.