Anupam Kher On Yoga Day : आज २१ जून आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये, भारतीय वाणिज्य दूतावासाने टाइम्स स्क्वेअर येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
या कार्यक्रमात १० हजार जण सहभागी झाले होते. या कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेरदेखील उपस्थित होते. त्यांनी योगाशी असलेले त्यांचे वैयक्तिक नाते शेअर केले.
अनुपम यांनी शनिवारी (२१ जून) सकाळी टाइम्स स्क्वेअर येथे साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अनुपम खेर यांनी योग कार्यक्रमात घेतला भाग
या प्रसंगी अनुपम खेर म्हणाले, “११ वर्षांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगातील सर्वांत प्रसिद्ध ठिकाणी टाइम्स स्क्वेअरवर येऊन मला आनंद होत आहे. माझे आजोबा योग शिक्षक होते, मी आयुष्यभर योग पाहिला आहे. मी योग करतो. मला हे वातावरण सर्वत्र दिसते. ते केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्वाचे आहे.”
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केले
त्याशिवाय अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आणि लिहिले, “११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी न्यू यॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर होतो ही माझ्यासाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल बिनय श्रीकांतजी यांचे आभार. चांगल्या वातावरणात योगा करण्याचा अनुभव खूप छान होता.”
जागतिक योग दिनाची सुरुवात कधीपासून?
योग ही भारताने सुरू केलेली मोहीम आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानंतर २०१५ पासून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर अनुपम खेर सध्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शुभांगी दत्त, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, अरविंद स्वामी, पल्लवी जोशी, करण टक्कर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट १८ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.