News Flash

४७०. इच्छा-चक्र

शारदामाता म्हणत की, ‘मिठाईचा अर्धा तुकडा जरी खायची इच्छा शेष राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो!

आपल्या अंतरंगातच जे शाश्वत आत्मसुख आहे त्याची जाणीव होत नाही आणि अशाश्वत अशा सुखासाठी माणूस लाचार होऊन दुनियेत स्वत:ची फरपट करीत राहतो. त्यायोगे कशाचीच शाश्वती न वाटून चिंता आणि भीतीनंही त्याचं जीवन झाकोळतं. थोडक्यात माणूस जे काही करतो त्याचंच फळ त्याच्या पदरात पडल्याशिवाय राहात नाही. सत्कर्माचं फळही चांगलंच मिळतं आणि दुष्कर्माचं फळ तापदायकच असतं. त्यामुळे मनुष्यजन्माची जी संधी लाभली आहे तिचा योग्य वापर करायला संत नेहमीच सांगतात. जसं कराल, तसं पावेल आणि तसंच भोगाल, हे संतसत्पुरुष सातत्यानं सांगतात. अगदी जवळ असलेलं सुख सोडून, मृगजळवत असलेल्या, केवळ भासमान असलेल्या सुखामागे माणूस धावत राहातो आणि ते सुख तर कधी जवळ येतच नाही आणि जवळचं सुख मात्र दिसेनासं, जाणवेनासं होतं, याकडे समर्थानी गेल्या श्लोकात लक्ष वेधलं. आता माणूस जसं करतो तसंच भोगतो, हे सूत्र पुढल्या श्लोकात समर्थ मांडत आहेत. प्रथम ‘मनोबोधा’चा हा १४०वा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू आणि मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे:

जयाचें तया चुकलें प्राप्त नाहीं।

गुणें गोविलें जाहलें दु:ख देहीं।

गुणावेगळी वृत्ति तेही वळेना।

जुनें ठेवणें मीपणें आकळेना।। १४०।।

प्रचलित अर्थ : ही जुनी ठेव असे आत्मसुख हे ज्याच्यात्याच्या मालकीचे असून त्याच्या अगदी जवळ आहे. पण भ्रमामुळे ते असूनही मिळत नाही. त्रिगुणांमध्ये सापडल्याने हा भ्रम झाला आहे आणि त्या भ्रमामुळे दु:खभोग वाटय़ाला आले आहेत. वृत्ती गुणांपासून मोकळी होत नाही आणि म्हणून जवळ असलेले आत्मधन गवसत नाही.

आता मननार्थाकडे वळू. ‘जयाचे तया चुकले प्राप्त नाही.’ ज्याचं त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही.. याचा एक अर्थ आपण पाहिला की जो जसं कर्म करील तसं फळ त्याला मिळाल्याशिवाय राहात नाही. आणि दुसरा अर्थ असा की आत्मस्वरूपात लीन होणं, खरं शाश्वत आत्मसुख प्राप्त होणं, हीच जर मनुष्यजन्माची खरी प्राप्ती असेल, तर ते आत्मसुख जिवाला प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही! आणि हा अर्थ अधिक खरा आहे. याचं कारण हे आत्मसुख जोवर लाभत नाही, तोवर जन्म-मृत्यूचं चक्र संपत नाही. शारदामाता म्हणत की, ‘मिठाईचा अर्धा तुकडा जरी खायची इच्छा शेष राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो!’ याचाच अर्थ असा की ज्या ज्या इच्छा माझ्या मनात उमटतात त्या पूर्णत्वास जोवर जात नाहीत, तोवर मला जन्मावं लागणार आहे. बरं, पुढच्याच जन्मात त्या इच्छांची पूर्ती होईल, असं नाही. एखादा आलिशान बंगला मी पाहिला आणि तसा बंगला माझा असावा, अशी इच्छा मनात आली. आता या जन्मी ती इच्छा अपूर्ण राहिली तर पुढच्या जन्मचक्रांमध्ये ज्या अनंत इच्छांचं भांडवल असतं त्यात या एका इच्छेचीही भर पडली असते. मग काळ, परिस्थिती आणि संपत्ती या सर्वाची अनुकूलता लाभून तसा बंगला बांधण्याची क्षमता ज्या जन्मात वाटय़ाला येते तेव्हाच तो बंगला बांधून होतो आणि मग अनंत इच्छांमधून एक इच्छा वजा होते! तरी तोवर आणखी किती इच्छांची भर त्यात पडली असेल, देवच जाणे. तर इच्छा केलीत तर ती पूर्ण होईपर्यंत परत परत यावंच लागेल.. जयाचे तया चुकले प्राप्त नाही! आता याच चरणाचा तिसरा अर्थ असा की ‘जयाचे तया चुकले’ ज्याच्या मालकीचं आत्मसुख आहे ना ते त्याला चुकलं आहे, ‘तया प्राप्त नाही’ ते त्याला मिळालेलं नाही. आता जे खरं सुख आहे ते जवळच असून का लाभलेलं नाही? तर अन्य सुखाची इच्छा अधिक बलवत्तर आहे म्हणून!
 -चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 1:49 am

Web Title: realization of eternal happiness
Next Stories
1 ४६९. अभागी
2 ४६८. अर्ध्यावर..
3 ४६७. जुनी ठेव : २
Just Now!
X