दंभ कसा घातक आहे, हे समर्थानी ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात सांगितलं आणि त्या दंभाच्या पकडीतून सुटण्याचा उपायही सांगितला आहे. त्या उपायाकडे आता वळू. हा दंभ कुणाच्या वाटय़ाला जात नाही? समर्थ सांगतात, ‘‘ज्ञानिया दंभ बाधेना एकाएकीं खडाखडी। उठोनि चालिला योगी दंभ तें कुतरें किती।। वैराग्य पाहिजे अंगीं उदास फिरती लिळा। दंभ तो उडाला तेथें लोलंगताचि खुंटली।। निस्पृया दंभ बाधीना निस्पृह पाहिजे बरा। अंतरें अंतरा भेदी तेथें दंभचि नाडळे।।’’ जो आत्मज्ञानी आहे त्याला दंभ बाधत नाही. दंभाचा प्रसंग येताच एकाएकी खडाखडी व्हावी याप्रमाणे तो तात्काळ तिथून निघून जातो. पुढे जे रूपक आहे ना, दंभ तें कुतरें किती हे फार विलक्षण आहे! आपण नव्या मुलखात जातो आणि अचानक कुत्री भुंकू लागतात. जणू ती जागा त्यांची असते. त्या हद्दीत अपरिचिताला पाहाताच ती भुंकू लागतात. आपण त्या हद्दीबाहेर जाईपर्यंत ती भुंकत असतात. ती हद्दीपुढे काही येत नाहीत! अगदी त्याचप्रमाणे दंभाच्या आधीन झालेला माणूस हा कुत्र्यासारखा ‘मी’ आणि ‘माझे’ची हद्द सांभाळत जगत असतो! किती तऱ्हेचा दंभ त्याला पाळत असतो याला अंत नाही.. जो आसक्त असतो तो एकाच जागी अडकून पडतो. जो अनासक्त आहे, विरक्त आहे तोच उदासीन आहे. जगाच्या देहबुद्धीला धरून असलेल्या सुख-दु:खाच्या कल्पनांबाबत तो उदासीन आहे. त्याची फिरती लिळा आहे! म्हणजेच तो द्वैतमय संसाराच्या एकाच स्थितीत अडकून पडत नाही. तो सतत फिरता असतो. म्हणजेच परिवर्तनाशीच जोडलेला असतो. अशा योग्याच्या चित्तातून लोलंगता म्हणजे हवे-नकोपणाची द्वंद्वात्मक, द्वैतमय विषयवासनाच उरली नसते. त्या चित्तातून दंभ पूर्णपणे लयाला गेला असतो. जो निस्पृह आहे त्याला दंभ बाधत नाही. या निस्पृहाची विलक्षण तऱ्हा समर्थ सांगतात ती म्हणजे, अंतरें अंतरा भेदी तेथें दंभचि नाडळे! काय विलक्षण आहे पाहा! अंतर हा शब्द दोनदा योजला आहे आणि दोन्हीचा अर्थ वेगळा आहे! पहिला जो अंतरें शब्द आहे त्याचा अर्थ जगापासून अंतर ठेवत! हा निस्पृह आहे तो जगाच्या सुख-दु:खाच्या, लाभ-हानीच्या, मान-अपमानाच्या कल्पनांपासून अंतर राखतो, वेगळा राहातो. या अभ्यासातून तो अंतरा भेदी आपलं अंतर्मनच भेदून टाकतो. म्हणजे जगापासून विलग करतो. ज्याला जगाची आसक्ती आहे, जगाकडून काही हवं आहे, तोच जगाला चिकटून राहाणार ना? आणि एखाद्याला जगाकडून पैसा, वस्तू नको असेल, पण जगाकडून मानाची अपेक्षा असेल तरी ‘हवेपण’ आहेच ना? ज्याला जगाकडून कशाचीच अपेक्षा नाही तो जगात असूनही आणि जगासाठी आवश्यक ते सारं काही करीत असूनही जगाचा नसणार! त्याच्यात दंभ कुठून येणार? आता सामान्य साधकानं प्रारंभिक वाटचालीत दंभातून सुटण्याचा जो अभ्यास करायचा आहे तो समर्थ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘अखंड आठवावे रे मरणाचें ध्यान अंतरीं। तेव्हांचि वैराग्य उठे दंभ लोटे परोपकारी।। मांसाचा मोधळा याचा दंभ तो कोण तो किती। सावधा दंभ बाधीना दुश्चिताला पछाडितो।।’’ आपल्या चित्तात ज्या ज्या गोष्टींचा ताठा आहे, दंभ आहे तो सारा देहाला धरूनच आहे. हा देह म्हणजे मांसाचा गोळा आहे. तो अंती जाणाराच आहे मग दंभ तरी कसा टिकेल? हे लक्षात घेऊन साधकानं मरणाचं स्मरण अंतरंगात सदोदित राखावं. त्यानं वैराग्य वृत्ती किंचित का होईना, मनाला स्पर्शू लागेल. या मार्गानं जो सावध होईल आणि ती सावधानता अखंड टिकवू लागेल त्याला दंभ बाधणार नाही. अनवधानानं जगणाऱ्याला दंभ बाधेल आणि त्याचं चित्तही दुश्चित्तच राहील. जो खरा सावध होतो, तोच खरा साधक असतो ना?
-चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2016 रोजी प्रकाशित
५७. षट्विकारदर्शन : दंभ-२
दंभ कसा घातक आहे, हे समर्थानी ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात सांगितलं
Written by लोकसत्ता टीम
First published on: 23-03-2016 at 05:20 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth philosophy on conceit