मुख्यमंत्र्यांचे राजनाथ सिंह यांना साकडे
दुष्काळी गावांच्या संख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकारने अतिरिक्त २२०० कोटी रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन केली. राज्यातील दुष्काळग्रस्त गावांची संख्या आता २९ हजार ५०० वर गेली आहे.
राज्यातील सुमारे १८ हजार गावांमध्ये खरीप पीकपरिस्थितीनुसार दुष्काळ जाहीर झाल्यावर केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता आणि त्यानुसार सुमारे तीन हजार कोटी रुपयांची मदत केंद्राने राज्याला दिलेली आहे. खरिपाच्या गावांमध्ये वाढ झाली असून त्यात रब्बीच्या पीकपरिस्थितीनुसारही दुष्काळी गावांच्या संख्येत भर पडली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांची संख्या २९ हजार ५० वर गेली आहे.
स्वतंत्र महामंडळ करणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामगार व रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांचीही नवी दिल्लीत भेट घेऊन राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयांबाबत चर्चा केली. राज्य सरकारने महामंडळ स्थापन केल्यास केंद्र सरकारला अधिक मदत देता येईल, असे सांगितल्याने त्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.