11 August 2020

News Flash

५४ हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प?

५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेला ‘एमयूटीपी-३ए’चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

उपनगरीय रेल्वेशी संबंधित अनेक प्रस्ताव दाखल; केंद्रीय अर्थसंकल्पात समावेशाची अपेक्षा

स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा मोडीत काढून त्याचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करण्यात आल्यानंतर आता मुंबईकरांच्या नजरा यंदा उपनगरीय रेल्वेवर कोणत्या नव्या सुविधांची घोषणा होतील, याकडे लागल्या आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेला ‘एमयूटीपी-३ए’चा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. यामध्ये २१० वातानुकूलित लोकल, सीएसएमटी ते पनवेल जलद उन्नत मार्ग, पनवेल ते विरार मार्ग, हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांबाबत यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश झाल्यास मुंबईकरांचा उपनगरीय रेल्वेप्रवास सुखकर होण्याची चिन्हे आहेत.

रेल्वे अर्थसंकल्प हा मुंबईकर प्रवाशांसाठी नेहमीच जिव्हाळय़ाचा विषय होता. मात्र, गेल्या वर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्र न मांडता तो केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे आता केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वे प्रवाशांच्या पदरी आशा पडणार की निराशा, याबाबत साऱ्यांना उत्सुकता लागली आहे.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर एक वातानुकूलित लोकल धावत आहे. तर आणखी एक लोकल वर्षभरात दाखल होणार सुरुवातीला नऊ लोकल दीड ते दोन वर्षांत दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण २४२ लोकल गाडय़ा आहेत. या गाडय़ा अन्य रेल्वे विभागांकडे पाठवून २१० वातानुकूलित लोकल दाखल करण्याचे नियोजन एमआरव्हीसीने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने केले आहे.  या सर्व वातानुकूलित लोकल २०२२ सालापर्यंत मुंबईत दाखल करता येतील का पहा, अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्या असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यानुसार रेल्वे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पाची एकूण किंमत २० हजार कोटी रुपये आहे.

पश्चिम रेल्वेवरील बहुचर्चित चर्चगेट ते विरार उन्नत रेल्वे प्रकल्प गुंडाळण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते पनवेल जलद उन्नत रेल्वे प्रकल्पावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. आधी स्वतंत्ररीत्या राबविण्यात येणारा सीएसएमटी-पनवेल उन्नत रेल्वे प्रकल्पाचा एमयूटीपी-३ ए मध्ये समावेश करण्यात आला. जेणेकरून स्वतंत्ररीत्या प्रकल्पाला अनेक मंजुरी मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि उन्नत प्रकल्प त्वरित मार्गी लागेल, अशी आशा असल्याचे सांगण्यात आले.

दोन लोकल फेऱ्यांमधील वेळ कमी करणारा ‘कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम’ (सीबीटीसी) प्रकल्पालाही एमआरव्हीसीकडून वेग देण्यात येत आहे. यात सिग्नल यंत्रणेत बदल केल्याने बरेच फायदे मिळणार असल्याचे सांगितले जाते. आधी हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान सीबीटीसी राबविण्याची योजना होती. आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते डहाणूपर्यंतही यंत्रणा राबविली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. त्याचाही एमयूटीपी-३ ए मध्ये समावेश आहे.

याशिवाय बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग, हार्बरवरील गोरेगावचा बोरिवलीपर्यंत विस्तार, कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग, कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा मार्ग, १५ स्थानकांत सुधारणा यासह अन्य काही तांत्रिक कामांचा एमयूटीपी-३ ए मध्ये समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2018 2:54 am

Web Title: 54 thousand crores railway project by mrvc expected to include in union budget
Next Stories
1 पुनर्वसन केलेले प्रकल्पग्रस्त पुन्हा झोपडय़ांत
2 चंद्रग्रहणाचा पुरेपूर अनुभव घेण्याची संधी
3 इर्ला नाल्याची वाट मोकळी होणार!
Just Now!
X