करोनाकाळात बालकांच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न; समाजमाध्यमावर फसव्या संदेशांचे पेव

पुणे / मुंबई : ‘करोनामुळे आईवडिलांचे निधन झाले आहे. मूल दत्तक द्यायचे आहे,’ अशा संदेशांचे पेव सध्या समाजमाध्यमांवर फुटले आहे. असहाय बालकांना बेकायदेशीररीत्या दत्तक देण्याचे किंवा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. या घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, अशा समाजकंटकांवर थेट गुन्हा नोंदवण्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा महिला व बालकल्याण विभागाने दिला आहे.

करोनाकाळात बालकांच्या समस्यांमध्येही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. करोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यास अशा बालकांचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे त्यांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडते. त्याचा गैरफायदा घेत काही समाजकंटक परस्पर मुलांची विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघडकीस आले आहे.

‘आईवडिलांचे करोनामुळे निधन झाल्याने दोन मुली अनाथ झाल्या असून, त्यांना दत्तक द्यायचे आहे’, अशा आशयाचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर सर्वत्र संचार करत आहे. त्यात एका महिलेचा क्रमांक देण्यात आला असून, या क्रमांकावर ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने संपर्क साधल्यानंतर तो बंद असल्याचे निदर्शनास आले.

मुळात मूल दत्तक घेणे किंवा देणे ही प्रक्रिया तेवढी सोपी नाही. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते, असे ‘ज्ञानदेवी चाइल्डलाइन’ या संस्थेच्या मानद संचालक डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले. समाजमाध्यमावर अशा प्रकारचे संदेश प्रसारित केले जात आहेत. परस्पर मूल दत्तक घेणे किंवा देणे या प्रक्रियेला कोणतेही कायदेशीर अधिष्ठान नाही. एखादे मूल अनाथ असल्याचे आढळून आल्यास ते बालकल्याण समितीकडे पाठवले जाते. त्यानंतर मूल निवारा केंद्रात पाठवले जाते. याबाबतची माहिती पोलिसांना दिली जाते. न्यायालयीन प्रक्रियाही पार पाडली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मूल दत्तक घेण्या-देण्याबाबत बेकायदा कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६०, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५ तसेच दत्तक नियमावली, २०१७ नुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.

महिला बालकल्याण आयुक्तालयाचे आवाहन

बेकायदा दत्तक प्रक्रिया होत असल्याचे आढल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. मूल दत्तक घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रि येचा अवलंब करणे आवश्यक आहे. बेकायदा दत्तक प्रक्रिया रोखण्यासाठी त्याची माहिती १०९८ या हेल्प लाइनवर अथवा (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) ८३२९०४१५३१ या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्तालयाने केले आहे.

कायदेशीर प्रक्रिया न राबवत मूल दत्तक घेणे किंवा देणे हा गुन्हा आहे. मुलांची अमानवी वाहतूक तसेच त्यांचे शोषण असे प्रकार आढळून आल्याने दत्तक प्रक्रिया पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत राहून पार पाडण्यात येते.

– डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, मानद संचालक, ज्ञानदेवी चाइल्डलाइन, पुणे</strong>