श्वसनाचे विकार बळावण्याची भीती

मुंबई : शहरातील किमान तापमानाचा पारा घसरताच हवेची गुणवत्ता मध्यमपासून वाईट स्तरापर्यंत ढासळली आहे. परिणामी श्वसनाचे विकार बळावण्याचा संभव आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर श्वसनाचे विकार असलेल्या आणि नुकतेच करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नोंदविले आहे.

शहरातील किमान तापमान २० अंशापर्यंत खाली घसरले असून सकाळच्या हवेत गारवा जाणवू लागला आहे. शहरात काही ठिकाणी आकाशात धूरमिश्रित आच्छादन दिसू लागले आहे. उन्हाळ्यात उष्ण हवा हलकी असल्याने प्रदूषित घटक हवेसोबत उंचावर जातात आणि प्रदूषणाचे प्रमाण कमी राहते. हिवाळ्यात या विरुद्ध प्रक्रिया होते. हवेतील आद्र्रता कमी होऊन कोरडी होते. रात्री आणि पहाटे धूर आणि धूलीकण जमिनीलगतच हवेत राहतात. यामुळे श्वसनविकार संभवतात.

दिवाळी सुरू होण्याआधीच शहरातील हवेची गुणवत्ता घसरण्यास सुरुवात झाली आहे. सफरच्या आकडेवारीनुसार, शनिवारी मध्यमस्तरापर्यंत असलेली शहरातील हवेची गुणवत्ता सोमवारी वाईट स्तरापर्यंत घसरल्याची नोंदली गेली. शहरातील काही ठिकाणी २.५ पीएम या प्रदूषित घटकांचे प्रमाण काही भागात खूप जास्त आढळले. माझगावमध्ये ३०५ या अतिशय वाईट पातळीपर्यंत पोहचले होते, तर चेंबूरमध्ये २९७ आणि मालाडमध्ये २९० या वाईट पातळीपर्यंत नोंदले गेले. थंडीची सुरुवात काही अंशी झाली असून येत्या काही दिवसांत जोर वाढल्यावर हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची शक्यता आहे. परिणामी श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. अस्थमा किंवा दमा यांसह अन्य श्वसनाचे आजार असलेल्यांनी करोना साथीच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या फुप्फुसांवर परिणाम होत असल्याने बरे झालेल्या रुग्णांनीही हिवाळ्यात खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्यतो व्यायामासाठी पहाटे बाहेर जाऊ नये. बाहेर जाण्याची वेळ आल्यास चांगल्या प्रतीच्या मुखपट्टीचा वापर करावा. ऑक्सिजनच्या पातळीवर देखरेख ठेवावी. ही पातळी कमी होत असेल, तर व्यायाम करणे टाळावे, असे फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.

करोना संसर्गामुळे न्युमोनिआ किंवा फुप्फुसावर परिणाम झालेल्या करोनाबाधितांनी धूर किंवा प्रदूषणाच्या ठिकाणी जाणे टाळावे. श्वसनाचे इतर संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लस आणि औषधोपचार वेळेत घ्यावेत.

– डॉ. जलील पारकर, श्वसनविकारतज्ज्ञ