News Flash

आंजर्ले किनारपट्टीवर कासवांची सर्वाधिक घरटी

आंजर्ले आणि वेळास किनारपट्टी कासव महोत्सवासाठी सज्ज होत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

२१ मार्चपासून महोत्सव

आंजर्ले आणि वेळास किनारपट्टी कासव महोत्सवासाठी सज्ज होत आहे. आंजर्ले किनारपट्टीवर गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा कासवांची सर्वाधिक घरटी आढळून आली आहेत. यंदा या किनारपट्टीवर दहा माद्यांनी घरटी बांधली आहेत. त्यामुळे महोत्सवाला भेट देणाऱ्या पर्यटकांना यंदा कासवांची अधिक पिल्ले समुद्रात मार्गस्थ होताना पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

महाराष्ट्राला लाभलेल्या तब्बल ७२० किलोमीटर किनारपट्टीपैकी अंदाजे २३७ किलोमीटरची किनारपट्टी रत्नागिरी जिल्ह्य़ाला लाभली आहे. या जिल्ह्य़ातील वेळास-दाभोळ किनारपट्टी क्षेत्राला ‘किनारा आणि सागरी संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. वेळास ते दाभोळ यादरम्यानची अंदाजे ६० किलोमीटरची किनारपट्टी कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे. वेळास, केळशी आणि आंजर्ले या किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले या प्रजातीचे मादी कासव अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर-मार्च महिन्यादरम्यान हे कासव येथील वाळूच्या किनाऱ्यांवर घरटी बांधून त्यात अंडी घालतात. साधारण एक मादी कासव १०० ते १५० अंडी घालते. ४५ ते ५५ दिवसांमध्ये या अंडय़ांमधून पिल्ले बाहेर पडतात. अंडय़ांमधून कासवांची पिल्ले बाहेर पडतानाच्या काळात येथे दरवर्षी वन विभाग, स्थानिक ग्रामपंचायत आणि सह्य़ाद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून किनारपट्टीवर कासव महोत्सवाचे आयोजन केले जाते. मुंबईसह राज्यभरातून मोठय़ा प्रमाणावर पयर्टक या महोत्सवाला भेट देतात. यंदा आंजर्ले किनारपट्टीवर २१ मार्च ते १० एप्रिलदरम्यान कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले जाणार आहे. वेळास किनारपट्टीवर १० मार्चपासून या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. तसेच हरिहरेश्वर किनारपट्टीवरही कासवांची ८ घरटी आढळून आली असून, पिल्लांच्या जन्माबाबत अंदाज येत नसल्यामुळे तेथील महोत्सवाच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

यंदा आंजर्ले किनापट्टीवर मादी कासवांची १० घरटी आढळली आहेत. त्यात सुमारे ११०० अंडी असल्याची माहिती सह्य़ाद्री निसर्ग मित्र संस्थेचे कासवमित्र अभिनय केळस्कर यांनी दिली. गेल्या दहा वर्षांत या किनाऱ्यावर केवळ सात ते आठ कासवांची घरटी आढळत होती. समुद्रमार्गे किनारपट्टीवर येणारा प्लास्टिकचा कचरा मादी कासवांना घरटी बांधण्याआड येतो. कासवांच्यासंवर्धनासाठीस्थानिक जनतेच्या मदतीने किनारापट्टीवर स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम करत असल्याचे केळस्कर यांनी सांगितले. पिल्लांच्या जन्मापासून त्यांना समुद्रात सोडण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने करण्यात येत असून कासवांच्या संवर्धनासाठी स्थानिक कासव मित्रांच्या मदतीने वन विभाग काम करत असल्याची माहिती येथील वनाधिकारी सुरेश वरक यांनी दिली.

अंडी व घरटय़ांची जपणूक

समुद्राच्या भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरटय़ांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरीत्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटय़ांची निर्मिती केली जाते. त्याला हॅचरी म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने के लेल्या खडय़ाप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतस्तत भटकू नयेत म्हणून जाळीदार टोपले ठेवले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 3:50 am

Web Title: anjarle beach turtle nest
Next Stories
1 राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा अद्याप निर्णय नाही- अशोक चव्हाण
2 केंद्रीयमंत्री नितीन गडकरींबरोबर क्षीरसागरांची राजकीय महामार्ग बांधणी
3 ‘स्टँड अप इंडिया’तून विदर्भाला मिळाले अवघे ६२ कोटींचे कर्ज!
Just Now!
X