गुजरातमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. भाजपा उमेदवारांना झटका देण्यासाठी शिवसेनेने गुजरातमध्ये आपले उमेदवारही उभे केले होते. मात्र, या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. या सर्वांच्या मताची बेरीज केली तरीही एकाही उमेदवाराचे डिपॉझिट वाचणार नाही. त्यामुळे आता कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याच्या मशीन विकत घ्याव्या लागतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विधानाचाही समाचार घेतला. आमच्या विकासाच्या मॉडेलवर युवराजांनी ट्विट केले होते. मात्र, त्यासाठी युवराजांनी पेंग्विन आणि पार्टीच्या बाहेर यायला हवे. आम्हाला आमचे विकासाचे मॉडेल सुरतमध्ये पहायला मिळाले. गुजरात आणि सुरतमध्ये तुम्ही जे उमेदवार उभे केले आहेत. त्या सर्व उमेदवारांची मते एकत्र केली तरी एकाही उमेदवाराचे डिपॉझिट वाचवू शकणार नाहीत. त्यामुळे कलानगर वाल्यांची अवस्था अशी झाली आहे, ते स्वत:चे डिपॉझिट वाचवण्यासाठी किंवा अपयश लपवण्यासाठी दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला तरी आनंद व्यक्त करतात. मात्र, ज्यांना काँग्रेसच्या विजयाचा आनंद होतेय तेदेखील एक दिवस काँग्रेसप्रमाणेच रस्त्यावर येतील, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

विशेष गोष्ट म्हणजे यावेळी मुंबई भाजपाने सेलिब्रेशनसाठी खास ‘सामना’ ढोल पथक मागवले होते. भाजपा उमेदवारांना झटका देण्यासाठी शिवसेनेने गुजरातमध्ये आपले उमेदवारही उभे केले होते. अखेर भाजपाने आज ‘सामना’चे ढोल वाजवून या सर्वाचा वचपा काढला.