दुष्काळामुळे दहीहंडी रद्द करण्याचा जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय म्हणजे नौटंकी असून, दुष्काळाच्या मुद्द्यावरून त्यांना राजकारण करायचे आहे, असे प्रत्युत्तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिले आहे. याआधी दुष्काळ नव्हता का, त्यावेळी आव्हाडांनी दहीहंडी का रद्द केली नाही, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे आव्हाडही सदस्य होते. मात्र, ते एकदाही या बैठकीला उपस्थित नव्हते. दहीहंडी कायद्याच्या चौकटीत साजरी करावी, असे त्यांना वाटत नाही. दुष्काळाच्या मुद्द्यावरून दहीहंडी रद्द करणाऱया आव्हाडांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक पैसा दिलेला नाही. जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी मदत केलेली नाही. एका ठिकाणीही त्यांनी चारा डेपो लावलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.