शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आलं आहे. या मुद्यावरून आता भाजपाने शिवसेनेवर जोरदार टीका करणं सुरू केलं आहे. “ या पुढे दसरा मेळाव्यानंतर नारा ए तकबीर… अल्ला हू अकबरच्या घोषणा ऐकू येणार बहुतेक” असं भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. तसेच, शिवसेनेने भगवा तर केव्हाच सोडला, पण आता केवळ हिरवा खांद्यावर घेणं शिल्लक आहे, असं देखील भातखळकर यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.

या मुद्यावरून भातखळकर यांनी अनेक ट्विट केले असून, शिवसेनवर निशाणा साधला आहे. “अजानच्या भोंग्यांना विरोध करणाऱ्या मानखुर्दच्या करिष्मा भोसले या तरुणीला पोलीसांनी का त्रास दिला याचे कारण आता उघड झाले…,लहान मुलांसाठी अजान स्पर्धे नंतर रस्त्यावर सामूहिक नमाज स्पर्धेचे आयोजनही करा…, मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतायत. ओवेसीला लाज वाटेल असे हे लांगुलचालन आहे.” असं भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

हे सरकार सर्व आघाड्यांवर शंभर टक्के अयशस्वी –
तर, पत्रकारपरिषदेत बोलताना भातखळकर म्हणाले की, महाविकासआघाडी सरकारने एक वर्ष कसंबसं पूर्ण केलं. एका वाक्यात महाविकासआघाडी सरकारच्या एका वर्षाचं वर्णन करायचं असेल, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात गडद असं तमोयुग म्हणजे महाविकासआघाडी सरकारचं वर्ष आहे. सर्व आघाड्यांवर शंभर टक्के अयशस्वी ठरलेलं असं हे सरकार आहे. मराठा आरक्षण, करोना संकटावर मात करण्याचा प्रश्न असेल हे सरकार सारखं घुमजाव करत आहे. या सरकारमधील पक्षांनी आपल्या विचारांपासून देखील यू टर्न घेतला आहे. म्हणून आजच मुंबईत शिवसेनेने या पुढच्या काळात अजनाची स्पर्धा आम्ही घेऊ कारण, अजान ऐकायला खूप गोड वाटतो, अशा प्रकारची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्यामुळे हा शंभर टक्के यू टर्न आहे. भगवा तर केव्हाच सोडला, पण आता केवळ हिरवा खांद्यावर घेणं शिल्लक आहे. अशाप्रकराची शिवसेनेची अवस्था आहे.

अजानमध्ये खूप गोडवा! शिवसेना नेत्याकडून अजान स्पर्धेचं आयोजन

जी विकास कामं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात एमएमआरडीए व सरकारने सुरू केली होती. त्या सर्व कामांना एकतर स्थगिती देणं किंवा त्या कामांचा खेळखंडोबा करणं हे या महाविकासआघाडी सरकारचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. अशी देखील टीका भातखळकर यांनी केली आहे.

तर, “अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस दिलं जाईल. यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार आहे,” अशी माहिती पांडुरंग सकपाळ यांनी दिली आहे. “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही,” असं शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ म्हणाले आहेत.