News Flash

विठ्ठलवाडीदरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

Central railway running late : विठ्ठलवाडी स्थानकानजीक स्थानकाजवळ रूळांना तडे गेल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

तांत्रिक बिघाडांचे शुक्लकाष्ठ पाचवीला पुजलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. विठ्ठलवाडी स्थानकानजीक स्थानकाजवळ रूळांना तडे गेल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. आठवड्याचा पहिलाच दिवस आणि ऐन गर्दीची वेळ असल्यामुळे नोकरदार मंडळींची चांगलीच गैरसोय झाली आहे. आज सकाळी आठ वाजता विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रूळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सीएसटीकडे जाणारी धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रूळांच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही अवधी जाणार आहे. सध्या या अप दिशेची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून गाड्या १५ ते २० मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. रविवारी रुळांच्या देखभालीसाठी आणि दुरूस्तीसाठी मेगाब्लॉक घेऊनही आज दुसऱ्याच दिवशी तांत्रिक बिघाड उद्भवल्याने प्रवाशांकडून मोठ्याप्रमाणावर नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर गेल्या काही दिवसांमध्ये रुळाला तडे जाणे किंवा सिग्नल यंत्रणेत बिघाड यासारख्या समस्या सातत्याने उद्भवताना दिसत आहेत. रुळांना वारंवार तडे जाण्यामागे तापमानातील फरक आणि रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची संख्या कारणीभूत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेने केला होता. तर पश्चिम रेल्वेनेही आपल्या हद्दीतील रुळांना तडे जाण्यासाठी किनारपट्टीला जबाबदार धरले होते. रेल्वे कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पश्चिम रेल्वेने तीन वर्षांत १३९ वेळा रुळांना तडे गेल्याच्या घटना घडल्याचे सांगितले. यात वातावरण बदलांबरोबरच रेल्वे रूळ किनारपट्टीजवळ असल्याचेही कारण देण्यात आले होते. सरत्या वर्षांच्या शेवटच्या आठवडय़ात कल्याणजवळ लोकल गाडीचे पाच डबे घसरून झालेला अपघात रुळांना तडा गेल्यानेच झाला होता. मध्य रेल्वेवर गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वे रुळांना तडा जाण्याच्या २६० घटना घडल्या आहेत. यासाठी रेल्वेकडून विविध कारणे दिली जात असून मध्य रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे रेल्वे रूळ ओलांडताना खडीवर दाब पडतो. त्यामुळे खडीची झीज होते. मध्य रेल्वेवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने रेल्वे रूळ जास्त तुटतात, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 9:42 am

Web Title: central railway local mumbai running late due to railway track crackdown
Next Stories
1 वांद्रे-विरार उन्नत रेल्वेसाठी दीड हजार कोटी
2 सनातन संस्थेवर कारवाई केव्हा?
3 भिंतीचे  कान : डोळे आणि जीभ..
Just Now!
X