एकामागोमाग वेगवेगळ्या स्थानकांवर झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे बुधवारी रात्री अक्षरश: तीनतेरा वाजले. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रात्री सव्वाआठच्या सुमारास पेंटाग्राफमध्ये झालेला बिघाड आणि त्यानंतर विक्रोळी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे कामावरून घरी येणाऱ्या प्रवाशांची अक्षरश: कोंडी झाली आहे. याशिवाय, ट्रान्सहार्बर मार्गावरील ऐरोली स्थानकावरही तांत्रिक बिघाड झाल्याचे समजते. सध्या सायन स्थानकातील पेंटाग्राफ दुरूस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी गाड्या खूपच उशीराने धावत आहेत.
ठाणे स्थानकातील गाडीत सुरूवातीला हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कांजुरमार्ग आणि सायन या रेल्वेस्थानकांवरही अशीच समस्या उद्भवल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे तब्बल ४०-४५  मिनिटे डाऊन मार्गावरील अनेक लोकल ट्रेन्स जागच्या जागीच थांबल्या होत्या. या बिघाडामुळे गाड्यांमधील वीजपुरवठाही खंडित झाला असून अनेक गाड्यांमधील लाईट आणि पंखे अधुनमधून बंद पडले आहेत. साधारण सव्वाआठच्या सुमारास हा बिघाड झाला होता. मात्र, अद्यापपर्यंत मध्य रेल्वेकडून याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सध्या डाऊन दिशेची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचेही वृत्त आहे.