लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असून, काँग्रेसने विभागवार मेळाव्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्यावर भर दिला आहे. निवडणुकीनंतर दिल्लीच्या सत्ताकरणात महत्त्व वाढावे म्हणून खासदारांची संख्या वाढविण्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भर दिला आहे. एकूणच गेल्या वेळी मिळालेले यश कायम राखण्याचे तर संख्याबळ वाढविण्याचे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्र पक्षांसमोर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस पवार हे पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांच्याशी मतदारसंघनिहाय चर्चा करणार आहेत. गेल्या वेळी आघाडीत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला २२ जागा आल्या होत्या. यापैकी आठ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. या मतदारसंघांचा प्रामुख्याने आढावा घेण्यात येणार आहे. याशिवाय अन्य मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेत महत्त्व प्राप्त होण्याकरिता १५ ते २० खासदारांची आवश्यतकता असते. यातूनच १५ खासदारांचे लक्ष्य राष्ट्रवादीने ठेवले आहे. मावळ, कोल्हापूर, हातकणंगले, शिरुर, कल्याण आणि नगर या गेल्या वेळी गमवाव्या लागलेल्या जागा कशा जिंकता येतील यावर राष्ट्रवादीने भर दिला आहे.
राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असतानाच काँग्रेसनेही निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन केले आहे. पक्षाने विभागवार मेळावे सुरू केले आहेत. तसेच वचनपूर्ती मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत २४० मेळावे पार पडल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. लोकसभेच्या चार मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष यांनी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने गेल्या वेळी आघाडीत २६ जागा लढविल्या होत्या व त्यातील १७ जागा जिंकल्या होत्या. हे यश कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान असले तरी गतवेळ एवढे यश मिळणे कठीण असल्याची चिन्हे आहेत