|| उमाकांत देशपांडे

दहावीच्या निकालास विलंबाची शक्यता

मुंबई : दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांना उपनगरी रेल्वेप्रवासाच्या परवानगीच्या गोंधळामुळे निकालास जुलै अखेरीपर्यंत विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र हा विलंब होऊ नये, यासाठी शिक्षकांना परवानगीची प्रक्रिया दोन-चार दिवसांत पार पाडण्याचे निर्देश देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाबाबत सीबीएसईच्या धर्तीवर सूत्र ठरवून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी बैठक बोलाविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहावी निकालाचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रात (एमएमआरडीए) क्षेत्रात शिक्षकांना आणि मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमधून प्रवासाची परवानगी हवी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

शाळांना मंडळाकडे गुण पाठविण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मंडळाकडून निकालाचे काम होईल, असे गायकवाड यांनी सांगितले. मात्र शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा मिळाल्यावर दहावीचे गुण मंडळाकडे पाठविण्यासाठी १०-१५ दिवसांचा कालावधी लागेल. आधीच्या परीक्षांचे रेकॉर्ड तपासून हे गुण द्यावयाचे आहेत. शाळांनी मंडळास गुण कळविल्यावर निकाल तयार करण्यास दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रेल्वेप्रवासाच्या परवानगीस उशीर झाल्यास निकालासही विलंब होणार आहे, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, बारावीच्या निकालाचे सूत्र ठरविण्यासाठी शिक्षण विभाग व मंडळाचे अधिकारी,शिक्षक-पालक प्रतिनिधी, प्राचार्य आदींची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या निकालाचे सूत्रही सीबीएसईच्या धर्तीवर असेल, काही मुद्द्यांबाबत शंका असल्याने त्याबाबत बदल केला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

‘क्यूआर कोड’ची सूचना…

आपत्ती व्यवस्थापन विभागाने क्यूआर कोडची प्रक्रिया करण्याची सूचना शिक्षण विभागास केली आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी गुरुवारी तातडीने परिपत्रक जारी करून दहावी निकालाशी संबंधित शिक्षकांची यादी, त्यांचे आधार कार्ड व अन्य तपशील मागविले आहेत. ते शाळांकडून मिळाल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून क्यूआर कोड पासची व्यवस्था मुंबई दुसऱ्या श्रेणीमध्ये आल्यावर करण्यात येणार आहे. दहावी निकालासाठी या क्षेत्रातील सुमारे १३ ते १४ हजार शिक्षकांसाठी पासची व्यवस्था करावी लागणार आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी ही आवश्यक असून त्यांना क्यूआर कोड दिला नाही, तरी निकालाचे काम अडणार आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश यादीत करावा, अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शिक्षकांची यादी, सेल्फी छायाचित्र पाठविल्यावर आणि मुंबई करोनाविषयक दुसऱ्या वर्गवारीत (लेव्हल टू ) गेल्यावर क्यू आर कोड पाठविला जाईल. त्यास जुलैचा पहिला आठवडा उजाडेल आणि त्यानंतर शिक्षकांचे काम सुरू होईल. परिणामी दहावी निकालास विलंब होणार आहे. त्याऐवजी शिक्षकांना ओळखपत्र पाहून लगेच प्रवासाची मुभा मिळाली, तरच विलंब टळू शकेल. – सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

दहावी निकालाचे मूल्यमापन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांना परवानगी दिली असली तरी ती किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षण उपसंचालकांकडून नावे येतील, मग रेल्वे पास ऑनलाइन एसएमएसच्या माध्यमातून रेल्वेकडून वितरित करण्यात येणार आहेत. यात अनेक दिवस जातील. त्यापेक्षा शाळेच्या ओळखपत्रावर पास देण्यात यावा. तसेच पहिली ते नववी व ११ वी च्या शिक्षकांना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) परवानगी द्यावी. -अनिल बोरनारे , प्रदेश सहसंयोजक, भाजप शिक्षक आघाडी

शिक्षकांची यादी दोन-चार दिवसांमध्ये शाळांकडून येणे अपेक्षित असून त्यानंतर पासाची व्यवस्था त्वरित करण्याचे प्रयत्न आहेत. निकालास विलंब होऊ नये, यासाठी हे काम लवकर करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या माध्यमातून समन्वय ठेवण्यात येत आहे. -वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री