शास्त्रीय आणि फ्यूजन संगीताच्या स्वरवर्षांवात श्रोते चिंब
लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार वितरण सोहळ्याला फ्यूजन संगीतकार, की-बोर्डवरील शास्त्रीय संगीताचे वादक अभिजित पोहनकर आणि ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. अजय पोहनकर यांच्या सुरांची साथ लाभली होती. पोहनकर पिता-पुत्राच्या शास्त्रीय आणि फ्यूजन संगीताच्या स्वरवर्षांवात उपस्थित श्रोते चिंब झाले.
फ्यूजन संगीत म्हटले की काही जण नाक मुरडतात. मूळ गाण्याची फ्यूजन संगीतात वाट लावली जाते, असेही काहींना वाटते. त्यातून शास्त्रीय संगीताचे फ्यूजन म्हणजे नाव ठेवायला आणखी संधी. पण अभिजित पोहनकर यांनी शास्त्रीय संगीतातील चिजा, ठुमरी आणि बंदिशी यांचे फ्यूजन करताना त्यातील शास्त्रीय संगीताच्या मूळ बाजाला कुठेही धक्का लावलेला नाही. शास्त्रीय संगीत वेगळ्या प्रकारे तरुण पिढीपर्यंत ते पोहोचवीत आहेत आणि त्याचाच प्रत्यय उपस्थित श्रोत्यांना या सोहळ्यात आला.
लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार प्रदान सोहळ्याची सुरुवात अभिजित पोहनकर यांच्या फ्यूजन संगीताने झाली. किरवाणी रागाने त्यांनी मैफलीला सुरुवात केली. की बोर्डवर लीलया फिरणारी त्यांची बोटे आणि तबला, गिटार, ड्रम्स यांची संगीतसाथ यामुळे पुरस्कार प्रदान सोहळ्याआधी एक मस्त सुरेल वातावरण तयार झाले.
राग सादरीकरणानंतर त्यांनी राजस्थानी लोकसंगीताचे फ्यूजन सादर केले. या वेळी त्यांना राजस्थानातील ‘मंगणीयार्स’ समूहाचे लतीफ खान आणि इलियाज खान यांनी साथ दिली. अभिजित आणि मंगणीयार्स यांनी सादर केलेल्या ‘नैना मिलाके’ या गाण्यावरील फ्यूजनला उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाची सुरेल सांगता करण्यासाठी पं. अजय पोहनकर व्यासपीठावर आले. त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या ‘नैना मोरे तरस गए, आजा बलम परदेस’ने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख्तर यांनी गायलेल्या एका प्रसिद्ध गझलने त्यांनी मैफलीची सांगता केली.
बाबा (पं. अजय पोहनकर) लहान असताना त्यांचे गाणे बेगम अख्तर यांनी ऐकले होते. ते गाणे ऐकून बेगम अख्तर यांनी ‘तू मोठा झालास की माझी ही गझल तू गा आणि तुझ्या आवाजात याची ध्वनिमुद्रिका काढ’ असे बाबांना त्या वेळी सांगितले. बाबांच्या साठाव्या वाढदिवशी बाबांच्याच आवाजात त्या गझलेची ध्वनिमुद्रिका काढण्यात आल्याची आठवण अभिजित यांनी या वेळी सांगितली.
त्यानंतर पं. अजय पोहनकर यांनी बेगम अख्तर यांची ‘ए मोहब्बत तेरे अंजानपे रोना आया’ ही प्रसिद्ध आणि लोकप्रिय गझल गायला सुरुवात केली आणि श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. अजय पोहनकर यांच्या सुरांत श्रोते चिंब झाले. खरे तर ही मैफल संपूच नये असे वाटत होते. पण वेळेचे भान ठेवत रंगलेल्या या मैफलीची अखेर ‘भैरवी’ झाली आणि ‘ए मोहब्बत तेरे अंजामपे रोना आया’चे सूर मनात गुणगुणत आणि कानात साठवत श्रोते सभागृहातून मार्गस्थ झाले. अभिजित पोहनकर आणि अजय पोहनकर यांच्या रंगलेल्या या सुरेल मैफलीत अक्षय जाधव (तबला), चिंटू सिंग (गिटार), अनिरुद्ध शिर्के (ड्रम्स) यांनी त्यांना संगीतसाथ केली.