आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

पालिकेने अद्ययावत असा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष उभारला असून एखादी दुर्घटना घडल्यावर सर्वच यंत्रणांशी समन्वय साधणे, घटनेची तीव्रता कमी करणे शक्य होणार आहे. मात्र मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती घडू नये यासाठी यंत्रणा नाही. ही यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच तशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईकरांना दिले.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेले आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष दुसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले आहे. व्हिडीओ वॉल आणि अन्य काही आधुनिक सुविधांनी युक्त अशा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, युवा सेना नेते आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे आदींनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील सुविधांची पाहणी केली.

एखादी दुर्घटना घडल्यानंतर तेथे तात्काळ पोहोचणे, अन्य यंत्रणांशी समन्वय साधणे आदी महत्त्वाची जबाबदारी पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष पार पाडत आहे. तसेच घटना घडल्यानंतर बचावकार्यात मोलाची मदत करून घटनेची तीव्रता कमी करण्यातही या कक्षाचा हातभार आहे. पोलीस, अग्निशमन दल, तटरक्षक दल, नौदल आदी यंत्रणांशी समन्वय साधणे पालिकेला शक्य होणार आहे. मात्र मुंबईत दुर्घटना घडूच नये अशी यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच अशी यंत्रणा उभारून ती लोकार्पण करण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मुंबईत पोलीस दलाने पाच हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविले असून त्यांच्या साह्य़ाने मुंबईतील गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपत्ती आल्यानंतर आपले डोळे उघडतात. याचा प्रत्यय २६ जुलै २००५ रोजी आला. मात्र त्यावेळी पालिकेने महत्त्वाची भूमिका पार पाडल्यामुळेच मुंबईत साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झाला नाही. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेल्या यंत्रणेची क्षमता वाढविण्यात आली. पण एखाद्या दुर्घटनास्थळी पालिकेची यंत्रणा पोहोचण्यापूर्वी नागरिकांनी कोणत्या प्राथमिक उपाययोजना करायच्या याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप’

निवडणुका जवळ आल्यानंतर विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावण्यात येत असल्याची शिवसेना-भाजपवर टीका केली जाते. मुंबई महापालिकेने अनेक कौतुकास्पद कामे केली आहेत. पण त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे पालिकेने केलेली कामे आम्हाला सांगणे भाग आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालिकेच्या कार्यक्रमांना आवर्जून येतात. पूर्वीचे मुख्यमंत्री पालिकेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी येत नव्हते, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी काँग्रेसचे नाव न घेता हाणला.