पारपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेत सुलभता आणण्यासाठी ही सेवा ‘डिजिलॉकर’ सुविधेशी जोडण्यात आली असून त्यामुळे पारपत्र अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जमा करणे, तसेच कागदपत्रांची पडताळणी या बाबी ऑनलाइन होतील.

पारपत्र अर्जदाराकडे ‘डिजिलॉकर’ खाते नसल्यास अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळ किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू करावे लागेल. त्यानंतर ‘डिजिलॉकर’मध्ये आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. पारपत्र अर्ज भरताना कागदपत्रांच्या पर्यायामध्ये ‘डिजिलॉकरकडून प्राप्त करा’ असा पर्याय निवडून ‘डिजिलॉकर’मधील कागदपत्रे अपलोड करता येतील.

‘डिजिलॉकर’मध्ये अपलोड करून ठेवलेले दहावीचे प्रमाणपत्र/ गुणपत्रिका, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र आणि ई-आधार ही कागदपत्रे मुंबईतील सर्व पारपत्र  केंद्रावर स्वीकारली जातील. पारपत्रासाठी अर्ज करताना ही कागदपत्रे अनिवार्य आहेत.

‘डिजिलॉकर’ हा केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम आहे. ‘डिजिलॉकर’मध्ये भारतीय नागरिक आपल्या खात्यात विविध कागदपत्रे ई-स्वरूपात अपलोड करून ठेवू शकतात. रस्ते आणि वाहतूक मंत्रालय, आयकर विभाग, सीबीएसई यांची यापूर्वीच ‘डिजिलॉकर’शी जोडणी झाली आहे. आता पारपत्र सेवा केंद्रानेही अर्ज करण्यासाठी ‘डिजिलॉकर’ची सुविधा स्वीकारली आहे.