१२ पैकी अवघ्या चार फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी

दोन वर्षे उलटल्यानंतरही कार्यालयीन वेळेतील चार फेऱ्यांचा अपवाद वगळता पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या इतर फेऱ्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यात दाखल होणाऱ्या अन्य वातानुकूलित गाडय़ांना प्रतिसाद मिळेल की नाही, अशी भीती पश्चिम रेल्वेला आहे.

पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये दाखल झालेल्या वातानुकूलित लोकल गाडीला पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील; परंतु या गाडीला अद्यापही प्रवाशांची प्रतीक्षा आहे. दिवसभरात चालवल्या जाणाऱ्या बारा लोकल फेऱ्यांपैकी सकाळ-संध्याकाळच्या कार्यालयीन वेळेतील चार लोकल फेऱ्यांनाच प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. डिसेंबर २०१७ पासून ते आतापर्यंत ८६ लाख ७७ हजार ८१९ प्रवाशांनी या गाडीने प्रवास केला असून त्यातून ३५ कोटी ९१ लाख २७ हजार ३८० रुपये महसूल पश्चिम रेल्वेला मिळाल्याचे सांगण्यात आले.

अवाच्या सवा भाडे, गैरसोयीच्या वेळा इत्यादी कारणांमुळे वातानुकूलित लोकलला कमी प्रतिसाद आहे, असे रेल्वेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. कार्यालयीन वेळेत गाडीच्या प्रवासी क्षमतेच्या जवळपास ९० टक्के प्रतिसाद प्रवाशांकडून मिळतो; परंतु कमी गर्दीच्या वेळी हेच प्रमाण ४० टक्क्य़ांच्याही खाली जाते. डिसेंबर २०१७ मध्ये या लोकलमधून सुमारे ९ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये हाच आकडा ४ लाख ६६ हजार ६७३ वर गेला; परंतु ही चार फेऱ्यांची प्रवासी संख्या आहे. कार्यालयाच्या वेळा टळल्या की वातानुकूलित लोकल बऱ्याचदा रिकामीच धावत असल्याचे सांगण्यात आले. एका वातानुकूलित लोकल गाडीची किंमत ही साधारण ५२ कोटी रुपये आहे. आतापर्यंत पश्चिम रेल्वेला या सेवेतून ३५ कोटी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यामुळे या गाडीचीही किंमत अद्याप वसूल झालेली नाही हेच दिसून येते.

एकूण पाच गाडय़ा

सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात पाच वातानुकूलित लोकल गाडय़ा दाखल आहेत. यात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल झालेली वातानुकूलित लोकल देखभाल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये आहे. त्याऐवजी दुसरी नवी लोकल चालवण्यात येते. ही गाडी सोमवार ते शुक्रवार चालवल्यानंतर तिला शनिवार-रविवार दुरुस्तीसाठी बाजूला ठेवण्यात येते. अन्य दोन लोकलच्या चाचण्या सुरू आहेत. या गाडय़ा जेव्हा संपूर्ण क्षमतेने रेल्वेच्या सेवेत येतील तेव्हा सर्वसाधारण गाडय़ांच्या अनेक फेऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे.

प्रतिसाद असलेल्या फेऱ्या

बोरीवली ते चर्चगेट – स. ७.५४

विरार ते चर्चगेट – स. १०.२०,

चर्चगेट ते बोरीवली – सायं. ५.४९

चर्चगेट ते विरार – सायं. ७.४९