मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने करोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आदेश धुडकावून विवाह सोहळ्याचे करोनाविषयक नियम धाब्यावर बसविल्याप्रकरणी पालिकेने कलिना परिसरातील ग्रॅन्ट यशोधन लॉन, गुरुनानक मैदान आणि नूर बँक्वेट हॉलविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

या विवाह सोहळ्यांमध्ये साधारण ३०० व्हराडी सहभागी झाले होते. त्यापैक बहुसंख्य मंडळी मुखपट्टीविनाच होती. तर सामाजिक अंतराच्या नियमांचे तीनतेरा वाजले होते. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना मुखपट्टीचा वापर बंधनकारक केला होता. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचेही आदेश दिले होते.

दरम्यानच्या काळात मुंबईत करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर करोनाविषयक नियम पाळणाऱ्यांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईत शिथिलता आली होती. विवाह सोहळ्यास केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी होती. असे असतानाही नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळ्यांना प्रचंड गर्दी होऊ लागली होती. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मुंबईतील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेने करोनाविषयक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

झाले काय?

  • मुंबई महापालिकेच्या ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कलिना परिसरातील तीन ठिकाणी शुक्रवारी आयोजित विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयातील आरोग्य खात्यामधील अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली.
  • तेथे सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होत नसल्याचे, व्हराडी मंडळी मुखपट्टीविना फिरत असल्याचे आणि ५० हून अधिक व्यक्ती उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या तीन ठिकाणच्या व्यवस्थापकांविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • कलिना परिसरातील सीएसटी रोडवरील ग्रॅन्ट  यशोधन लॉन, गुरुनानक मैदान आणि नूर बँक्वेट हॉल या तीन ठिकाणी विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. नियम धाब्यावर बसविल्याबद्दल या तिन्ही ठिकाणच्या विवाह सोहळा प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.