मुंबईत निर्बंध शिथिल केल्याच्या पहिल्याच दिवशीचे चित्र

मुंबई : मुंबईतील निर्बंध शिथिल केल्याच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठा, रेल्वे, बस सर्वत्र गर्दी उसळल्याचे दिसले. काही प्रमाणात अंतर, मुखपट्टी असे निकष पाळून तर काही ठिकाणी पायदळी तुडवून नागरिकांची वर्दळ सुरू होती. सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या वाढीमुळे रेल्वे स्थानकांतही गर्दी झाली होती. गर्दी वाढत असताना मुंबईतील लसीकरणाचे प्रमाण मात्र जेमतेम एक टक्क्यापर्यंत पोहोचले आहे.

राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी, पालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार तिसऱ्या स्तरात मोडतात. त्यामुळे सोमवारपासून या शहरांमधील सरकारी व खासगी कार्यालयांतील उपस्थितीत ५० टक्के पर्यंत, तर दुसऱ्या स्तरात मोडणाऱ्या ठाणे, नवी मुंबई या पालिकांमधील सरकारी व खासगी कार्यालयीन उपस्थिती १०० टक्के करण्यात आली. त्यामुळे लोकल प्रवासाबरोबरच पास नूतनीकरणासाठी  तिकीट खिडक्यांसमोर मोठी गर्दी झाली. बाजारपेठा सुरू झाल्यानंतर मुंबईतील बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी उसळली. पावसाळी पादत्राणे, छत्र्या, शालेय साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल यांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे रस्त्यांवरही अधिक वर्दळ दिसत होती.

मुंबईतील बेस्ट बसमधूनही १०० टक्के  प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू झाली. परंतु बसचालक आणि वाहकांकडून उभ्याने प्रवासी नाकारण्यात येत असल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना ताटकळावे लागले.

दोन मात्रा केवळ एक टक्का नागरिकांना

मुंबईत ४५ ते ५९ वयोगटातील सुमारे १० लाख ४३ हजार नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असली तरी यातील केवळ एक टक्का म्हणजे सुमारे १ लाख ६१ हजार नागरिकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या वयोगटातील केवळ एक टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ६० वर्षांवरील २७ टक्के नागरिकांच्या दोन्ही लशींच्या मात्रा पूर्ण झाल्या आहेत. या वयोगटात सुमारे २८ लाख १३ हजार नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर यातील सुमारे ७ लाख ६८ हजार जणांना दुसरी मात्रा दिली गेली आहे. १८ ते ४४ वयोगटातील सुमारे साडेचार लाख नागरिकांनी पहिली मात्रा घेतली असून त्यातील केवळ १ टक्का नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. अत्यावश्यक सेवेतील सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरण अद्याप झालेले नाही. या गटात सुमारे २ लाख ३४ हजार जणांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर सुमारे १ लाख २८ हजार जणांना दुसरी मात्रा दिलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही सुमारे ६८ हजार कर्मचाऱ्यांची दुसरी मात्रा अजून झालेली नाही. या गटामध्ये सुमारे १ लाख ८६ हजार कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा दिलेली असून यातील सुमारे १ लाख १८ जणांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.