पुणे विद्यापीठाच्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ या नामविस्तारास विविध आंबेडकरवादी व ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. पुणे विद्यापीठाचे नामांतर ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ असेच झाले पाहिजे, असा इशारा देण्यासाठी पुण्यात ३० नोव्हेंबरला एक परिषद होणार आहे.
एका महान क्रांतिकारी स्त्रीच्या नावापुढे गलिच्छ-जातीयवादी  इतिहास असलेल्या पुण्याचा उल्लेख कदापि सहन करणार नाही, असा इशारा ज्येष्ठ फुले-आंबेडकरवादी नेते राजा ढाले यांनी दिला आहे.
२६ ऑक्टोबर २०१३ ला पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला फुले-आंबेडकर विचारधारा, सत्यशोधक ओबीसी परिषद, तसेच इतर आंबेडकरवादी व ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. या आधी अनेकवेळा आम्ही ओबीसींच्या धर्मातर जनजागृती परिषदांमध्ये पुणे विद्यापीठाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ, असे नामांतर करावे, असे ठराव करून ते राज्य सरकारकडे पाठविले आहेत. असे असताना अर्धवट नामांतर करण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी केला आहे.
राजा ढाले यांनी नामविस्ताराला तीव्र विरोध केला आहे. तुम्ही तयार केलेल्या ढाच्यात महापुरुषांना कोंडण्याचे कारस्थान का करता, अशी पृच्छा त्यांनी केली. ज्या पुण्यात पेशव्यांनी अस्पृश्यांवर गुलामगिरी लादली, त्या पुणे नावाचा आग्रह का धरला जात आहे? हा सुद्धा एक जातीयवादच आहे, असा आरोप त्यांनी केला.
आधुनिक युगात स्त्रियांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांच्या स्वातंत्र्याला वेगळा आकार देणारी सावित्रीबाईंसारखी क्रांतिकारी स्त्री जगातही झाली नाही. त्या महान स्त्रीचे नाव विद्यापीठाला देताना पुणे शब्दाचा आग्रह धरल्यास ते सहन केले जाणार नाही. याची सरकारला जाणीव करून देण्यासाठी पुण्यात ३० नोव्हेंबरला इशारा परिषद होणार आहे, असे ढाले यांनी सांगितले.