प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाची चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळा आणि मुंबई महापालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. खासगी प्रयोगशाळेकडून करोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाला एक-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर प्रयोगशाळांकडून रुग्णाची माहिती विलंबाने मिळत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अथवा काही लक्षणे जाणवू लागल्यामुळे खासगी डॉक्टरांच्या शिफारशीनुसार अनेक मुंबईकर पालिकेने निर्देशित केलेल्या खासगी प्रयोगशाळेत करोनाविषयक चाचणी करून घेत आहेत. चाचणीचा अहवाल आल्यानंतर प्रयोगशाळेकडून त्याची माहिती थेट संबंधित व्यक्तीला कळविण्यात येते. करोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेकडून समजताच अनेक जण घाबरून जातात. आता पालिकेचे अधिकारी, कर्मचारी येऊन रुग्णालयात वा अलगीकरण, विलगीकरण कक्षात दाखल

करतील, अशी रुग्णाची अपेक्षा असते. त्यामुळे रुग्ण पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करीत राहतो. मात्र काही रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी २४ तासांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली आहे.

संबंधित रुग्णाला चाचणी अहवालाबाबत दिलेली माहिती पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाला एक अथवा दोन दिवसांनी मिळते. माहिती मिळाल्यानंतर तात्काळ रुग्णाच्या घरी पालिकेचे कर्मचारी पोहोचतात

आणि त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. त्यानंतर त्याचे घर, इमारत निर्जंतुक केली जाते. मात्र

अनेक नागरिक खासगी प्रयोगशाळेत चाचणी करतात. चाचणीच्या अहवालाची माहिती प्रयोगशाळेकडून प्रथम थेट संबंधित व्यक्तीला देण्यात येते.

त्यानंतर दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी ती पालिकेला मिळते. त्यामुळे रुग्णांपर्यंत पोहोचण्यात विलंब होत असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

रुग्णालयाचे खेटे

करोना झाल्याचे कळल्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे स्वत:हूनच रुग्णालयात दाखल होण्याचा प्रयत्न रुग्णांकडून केला जातो. मात्र खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना विविध रुग्णालयांच्या दारी खेटे घालण्याची वेळ येत आहे. परिणामी करोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय मानसिकदृष्टय़ा खचू लागले आहेत. एकूण परिस्थिती लक्षात घेत करोनाची चाचणी करण्यासाठी परवानगी दिलेल्या खासगी प्रयोगशाळा आणि पालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा रुग्णांना फटका सहन करावा लागत आहे.