राज्य सरकारने सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली आणि दिल्लीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला परखड बोल सुनावले आहेत. अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या, मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि सचिन वाझेंचा या प्रकरणातला कथित सहभाग या मुद्द्यांवरून निशाणा साधतानाच फक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना हटवून भागणार नाही, सरकारमधल्या त्यांच्या सूत्रधारांना शोधून काढलं पाहिजे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. “सचिन वाझे, परमबीर सिंग ही तर फक्त प्यादी आहेत. या प्रकरणाचे खरे सूत्रधार तर सरकारमध्येच असून त्यांना शोधून काढण्याच काम तपास यंत्रणांना करावं लागणार आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

अँटिलिया प्रकरणात नाव घेतलं जात असलेले सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे हे थेट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करत होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी गेल्या काही दिवासांपासून रान उठवलं होतं. अखेर, त्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने बुधवारी काढले असून त्यांच्या जागेवर राज्याचे पोलीस महासंचालक असलेले वरीष्ठ IPS अधिकारी हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली आहे. तर परमबीर सिंग यांना तुलनेनं कमी महत्त्वाच्या गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे? वाचा त्यांची संपूर्ण कारकिर्द

“सचिन वाझेंना त्या पदावर का आणलं?”

परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर भाजपाचं समाधान झालंय का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला. “हा सगळा प्रकार सचिन वाझे एकटेच करू शकत नाही. त्यामुळे यामध्ये अजून कोण कोण आहेत, त्याचा देखील तपास व्हायला हवा. हे पोलिसांचं अपयश नसून सरकारचं अपयश आहे. कारण सरकारने भूतकाळ माहिती असलेल्या एका व्यक्तीला इतक्या महत्त्वाच्या पदावर बसवलं. त्यामुळे त्यांच्याकडे असं काहीतरी आहे ज्यासाठी सरकारकडून त्यांना एवढं पाठिशी घातलं जातंय”, असं फडणवीस म्हणाले. तसेच, “मला वाटतं की या प्रकाराच्या मुळापर्यंत जायला हवं. ज्या हेतूसाठी सचिन वाझेंना या पदावर आणलं गेलं, त्या हेतूचा या प्रकरणाशी काय संबंध आहे हे देखील तपास यंत्रणांना शोधावं लागणार आहे”, असं देखील त्यांनी सांगितलं.

“परमबीर सिंग, सचिन वाझे ही छोटी माणसं”

या सगळ्या प्रकरणावर राज्य सरकारमधील काही व्यक्तींचा आशीर्वाद असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. “परमबीर सिंग किंवा सचिन वाझे ही फार छोटी माणसं आहेत. यांच्यामागे कुणाचा आशीर्वाद आहे, हे शोधून काढायला हवं. या प्रकरणात परमबीर सिंग यांची जबाबदारी आहेच. कारण सचिन वाझे थेट त्यांना रिपोर्ट करत होते. पण सचिन वाझेंना ऑपरेट करणारे अजून काही लोकं सरकारमध्ये बसले आहेत. तुम्ही परमबीर सिंग यांना तर हटवलं. पण सरकारमध्ये बसलेल्या त्या व्यक्तींची चौकशी कोण करणार? आता कितीही दबाव आला, सरकारमधल्या कोणत्याही पदावरच्या व्यक्तीपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे जात असतील, तरी तिथपर्यंत जाऊन सचिन वाझेंचे सरकारमधले ऑपरेटर कोण आहे, हे तपास यंत्रणांना शोधून काढावंच लागेल”, असं देखील फडणवीस म्हणाले.

“मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण कधीच झाले नव्हते”