महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने (MIDC) धारावी परिसरातील गरजू नागरिकांना दोन लाख किलो धान्याचे वाटप करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून अन्नधान्याने भरलेल्या ट्रक रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी. मलिकनेर उपस्थित होते.
मुंबईतील धारावी परिसराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या परिस्थितीत येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एमआयडीसीने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबविला. येथील कामराज ज्युनियर कॉलेजमधून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी धान्य, तांदूळ, आटा, तेल तूरडाळ, रवा, मसाला मीठ, साबण आदींचे वाटप करण्यात आले. एकूण दोन लाख किलो धान्याचे आज वाटप करण्यात आले. सुमारे दहा हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता मारुती कलकुटकी, एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता राजेश मुळे व प्रशांत चौधरी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मिशेल झेवियर आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांना सामाजिक अंतराचे महत्व विषद करण्यात आले. या उपक्रमास धारावी येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनीही मदतीचा हात दिला.
दहा हजार नागरिकांना याचा लाभ होतोय. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता मारुती कलकुटकी, सहाय्यक अभियंता राजेश मुळे व प्रशांत चौधरी, कामराज कॉलेजचे प्राचार्य मिशेल झेवियर उपस्थित होते@CMOMaharashtra @iAditiTatkare @AUThackeray @ShivSena @MahaDGIPR @RRPSpeaks @NCPspeaks @INCMaharashtra pic.twitter.com/BTPVixYrqx
— Subhash Desai (@Subhash_Desai) May 26, 2020
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने मागील अडीच महिन्यांपासून राज्याच्या विविध भागातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वास्तूचे वाटप केले जात आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख किलो धान्याचे वितरण करण्यात आले आहे.