ताणतणाव आणि नैराश्य या आजच्या जीवनशैलीत दिवसेंदिवस मोठय़ा होत जाणाऱ्या विषयांच्या मुळाशी जाणारे संशोधन करणाऱ्या वैज्ञानिक डॉ. विदिता वैद्य यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी थेट संवाद साधायची संधी येत्या गुरुवारी (दि.१५) मुंबईत होणाऱ्या ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मधून मिळणार आहे.
केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मधून विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची प्रेरणादायी यशोगाथा उलगडण्याचा प्रयत्न असतो. या वेळी व्हिवा लाउंजच्या व्यासपीठावर डॉ. विदिता यांच्या रूपाने प्रथमच विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकाला आमंत्रित करण्यात आले आहे.
विदिता वैद्य सध्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत असून, मानवी मेंदूत भावभावना नेमक्या कशा निर्माण होतात, याविषयी त्या संशोधन करीत आहेत. त्यांनी याविषयी आतापर्यंत केलेल्या संशोधनाचा नैराश्यावरील उपचारांना मोठा फायदा झाला आहे.
नैराश्यावरील औषधांचा परिणाम लवकरात लवकर व्हावा यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरले आहे. विदिता वैद्य यांना प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
मेंदूतील भावभावनांच्या गुंत्याचा वेध घेणाऱ्या या वैज्ञानिकाशी गप्पा मारण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने मिळणार आहे. विदिता यांच्या संशोधन विषयाबरोबच विज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि करिअर संधी, भारतातील आणि भारताबाहेरील संशोधन अनुभव अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा होणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश मिळेल.