मुंबई : जम्मू-काश्मीर येथील लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईतही नौदलाच्या तळाच्या परिघाच्या तीन किलोमीटर क्षेत्रात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन उडविण्यासाठी आधी नागरी उड्डाण महासंचालकांची (डीजीसीए) परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. तसेच विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे.

ड्रोनद्वारे लष्करी तळांना लक्ष केली जाण्याची शक्यता लक्षात घेता यंत्रणांनी खबरदारी म्हणून संरक्षण क्षेत्राशी संबंधित अस्थापनांच्या जवळ ड्रोन उडविण्यास बंदी घातली आहे. मुंबईतील नौदल अस्थापनांच्या परिघापासून तीन किलोमीटरच्या क्षेत्राला ‘नो फ्लाय झोन‘ घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात ड्रोन उडवण्यास कोणत्याही व्यक्ती अथवा नागरी संस्थांना मज्जाव करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत आदेश दिले आहेत. त्

तसेच या क्षेत्रात ड्रोन उडवायचे असल्यास नियोजित उड्डाणापूर्वी किमान एक आठवडा आधी डिजी स्काय (www.dgca.nic.in)  संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरी उड्डाण महासंचालकांची (डीजीसीए) परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच या परवानगीची प्रत पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान पूर्व परवानगीशिवाय उडविण्यात येणारे हवाई ड्रोन किंवा मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) आढल्यास नौदलाकडून ते जप्त किंवा नष्ट करण्यात येणार आहे. तसेच याचे उल्लंघन करून ड्रोन उडविणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही नौदलाने स्पष्ट केले आहे.