या वर्षीच्या पर्वात कलानगरी कोल्हापूरचाही समावेश
महाविद्यालयीन तरुणाईच्या नाटय़अवकाशाला गेल्या तीन वर्षांपासून व्यापून राहिलेली, अनेक गुणवंत कलाकारांना चित्रपट आणि मालिकांची सोनेरी दारे उघडून देणारी महाराष्ट्रातील बहुमानाची एकांकिका स्पर्धा म्हणजे ‘लोकसत्ता लोकांकिका’. या स्पर्धेत प्रवेशासाठीची घटिका आता समीप येऊ लागली आहे.. येत्या नोव्हेंबरपासून या स्पर्धेचे चौथे पर्व सुरू होत आहे. दर वर्षीप्रमाणेच मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, रत्नागिरी या केंद्रांमधून ही राज्यस्तरीय महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा होणार आहे. मात्र या वर्षी त्यात एका वेगळ्या केंद्राची भर पडली आहे. ती म्हणजे कलानगरी कोल्हापूरची. नाटय़, चित्रपट, चित्रकला अशा विविध कलांच्या या पंढरीत यंदा प्रथमच ‘लोकांकिका’चा रंगमंच सजणार आहे.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘झी युवा’ आणि ‘केसरी टूर्स’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे राज्यातील कानाकोपऱ्यातील महाविद्यालयीन तरुणांना नाटय़ आणि चित्रपटविश्वातील नामवंतांसमोर आपली कला सादर करण्याची मिळणारी संधी. याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी टॅलेंट पार्टनर आहेत ‘आयरिस प्रॉडक्शन’.
‘लोकांकिके’तील गुणवंतांना हेरून त्यांना मोठय़ा पडद्यावर आणण्याचे काम ‘आयरिस प्रॉडक्शन’ने स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून केले. यातून अनेकांना नाटक-चित्रपट-मालिकेतून काम करण्याची संधी मिळाली. सिद्धी कारखानीस हे याचे सध्याचे गाजत असलेले एक उदाहरण. सिद्धीसारखाच अनुभव ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये सहभागी झालेल्या अनेक गुणवंतांच्या वाटय़ाला आला आहे. तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्कृष्ट प्रतिभा आणि दर्जेदार आयोजनासाठी वाखाणल्या जाणाऱ्या ‘लोकांकिका’च्या चौथ्या पर्वाची नांदी लवकरच होणार आहे. तेव्हा, महाविद्यालयीन रंगकर्मीनो, आता तयारीला लागा..
अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्याची महत्त्वाकोंक्षा असलेल्या तरुण-तरुणींसाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ हे उत्तम व्यासपीठ आहे. केवळ या स्पर्धेत पुरस्कार मिळवणाऱ्यांनाच नव्हे, तर जे जे उत्तम काम करतात त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून निवडले जाते. त्यांना हळूहळू नाटय़, मालिका वा चित्रपट क्षेत्रात
कोम करण्याची, स्थिरावण्याची संधी मिळते. मला स्वत:ला या स्पर्धेचा खूप फायदा झाला. ‘आयरिस प्रॉडक्शन’कडून मला पहिल्यांदा ‘देवयानी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. आता मी ‘लव्ह लग्न लोचा’ ही दुसरी मालिका करते आहे.
सिद्धी कारखानीस, ‘लोकांकिका’ विजेती