आपल्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिलं अदा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीज बिलांच्या सवलतीचा निर्णय घ्यावा. याबाबत निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा अल्टिमेटमच भाजपाचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भारतीय जनता पार्टीचे वतीने आज मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाच्या वेळी बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये असलेला बेबनाव पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडला. राज्याचे उर्जा मंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतू उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांत सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे दुष्पाप हे महाविकास आघाडी सरकार करीत आहे. परंतु जो पर्यंत राज्यातील जनतेला ३०० युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा सुद्धा आ. भातखळकर यांनी दिला आहे.

तसंच, करोनाच्या काळात भरमसाठ व अंदाजे वीज बिल अदा करणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ‘शॉक’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सुद्धा आ. भातखळकर यांनी व्यक्त केला.