वाहनाची कागदपत्रे मागितल्यामुळे वाहतूक पोलीस विलास शिंदे (५२) यांच्या डोक्यात लाकडाच्या फळीने वार करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी अहमद अली मोहम्मद अली कुरेशी या २३ वर्षांच्या तरुणाला सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरण नसले (फाशीच्या शिक्षेसाठी) तरी आरोपींना दया दाखवल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने कुरेशी याला शिक्षा सुनावताना प्रामुख्याने नमूद केले.

चार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. कुरेशी याने व त्याच्या लहान भावाने शिंदे यांच्या डोक्यात लाकडी फळीने वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. घटनेच्या वेळी कुरेशीच्या भावाचे वय १६ वर्षे होते. परंतु त्याच्यावर सजाण गुन्हेगार म्हणून खटला चालवण्यास बाल न्याय मंडळाने परवानगी दिली होती. खून व बलात्काराच्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींवर सजाण म्हणून खटला चालवण्यास २०१६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्याचनुसा कुरेशीच्या भावावरही सजाण म्हणून खटला चालवण्यात परवानगी दिली गेली आहे. शिंदे यांच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एम. जयस्वाल यांनी कुरेशी याला शुक्रवारी दोषी ठरवले होते.

प्रकरण काय? : शिंदे हे खार येथील एस. व्ही. रस्त्यावरील मॅक्वॉइड पेट्रोल पंपाजवळ कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या कुरेशी याला शिंदे यांनी अडवले आणि त्याला परवाना दाखविण्यास सांगितले. मात्र याचा राग आल्याने कुरेशी आणि त्याच्या भावाने लाकडाच्या फळीने शिंदे यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या पोटात लाथा मारून त्यांनी पोबारा केला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी शिंदे यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.